बेपत्ता अभियंता तरुणाचा खून; खेड घाटात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह | पुढारी

बेपत्ता अभियंता तरुणाचा खून; खेड घाटात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

राजगुरुनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हिंजवडी आयटी पार्कमधील एका नामांकित कंपनीत नोकरी करणार्‍या युवकाचा खून झाला असून, हा प्रकार राजगुरुनगर (ता. खेड) परिसरात घडल्याचे समोर आले आहे. सौरभ नंदलाल पाटील (वय 23, रा. एबीसी जंक्शन, आकुर्डी; मूळ रा. शिर्डी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तो 28 जुलैपासून बेपत्ता झाला होता.

पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात रविवारी (दि. 6 ) कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. त्याचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातील प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे. त्याचा खून कोणी व का केला? याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक बिरुदेव काबुगडे यांनी फिर्याद दिली आहे.

सौरभ पाटील आठवडाभरापासून बेपत्ता होता. त्याच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क होत नसल्याने नातेवाईक संदीप सोनवणे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार दिली होती. त्याची दुचाकी होलेवाडी (ता. खेड) परिसरात एका शेतात आढळली होती. लगतच विहिरीच्या कठड्यावर त्याच्या गाडीची चावी पोलिसांना मिळाली. मात्र, त्याचा कुठेही शोध लागत नव्हता. नाशिक महामार्गावरील जुन्या खेड घाटात सांडभोरवाडी गावच्या हद्दीत पाटील याचा कुजलेल्या अवस्थेत म़तदेह आढळला. खेड पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पथक तयार केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.

हेही वाचा

धोंड्याच्या महिन्यामुळे जावयांची चंगळ

पुणे : निदर्शने करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Back to top button