डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे निसर्गसौंदर्य | पुढारी

डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे निसर्गसौंदर्य

तुषार मोढवे

कडूस(पुणे) : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात धार्मिक, भौगोलिक, कृषीबरोबरच नैसर्गिक पर्यटनाचा पावसाळ्यातील निसर्ग आकर्षित करत असून, निसर्ग पाहण्याबरोबरच निसर्गाचा खराखुरा आनंद घेण्यासाठी दिवसेंदिवस परराज्यांतून पर्यटक येऊ लागले आहेत. कुंडेश्वर देवस्थान असल्याने देवभूमीला निसर्गाने आपल्या खजिन्यातून अप्रतिम निसर्गाचं दान भरभरून दिलं आहे. महाबळेश्वरसारख्या निसर्गाच्या सुंदरतेचा अनुभव घेण्यासाठी श्री कुंडेश्वर डोंगरावर पर्यटक भेट द्यायला विसरत नाहीत.

लहान-मोठे डोंगरमाथे अनेक विविध जलरंगांच्या छटांमध्ये न्हाऊन निघत आहेत. टपोर्‍या थेंबांनी ओघळणारा पाऊस, धुक्यात हरवलेल्या पर्वत-शिखरांवरून आवेगाने झेपावणारे सहस्रावधी प्रपात, लालसर वीटकरी पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे, पठारांवर दाटीवाटीने उगवलेले हिरवे-पोपटी गवत, पाणी पिऊन टवटवित, तजेलदार झालेल्या झाडवेली, सैरावैरा धावणारा उनाड रानवारा आणि जोडीला अंगावर शिरशिरी आणणारा मस्त गारवा, अहाहा सारे सारे केवळ अवर्णनीय डोळ्यांची पारणे फेडणारे आहे.

पावसाळ्यात हिरवा शालू परिधान करून निसर्गाचे मुक्त नृत्य जेथे सुरू असते ते म्हणजे कुंडेश्वर. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधून कोसळणारे असंख्य धबधबे, दुधाचे घट फोडत खळखळ वाहणारे ओढे, डोंगरांना आच्छादून टाकणारे काळेभोर ढग, घाट रस्त्यांना कवेत घेणारी धुक्याची दुलई, हिरवाई परिधान केलेली माळ-राणे, दुथडी भरून वाहणार्‍या नद्या, ढवळ्या-पवळ्याचे जोत हाकणारा शेतकरी, डोंगर उतारावरच्या हिरव्याकंच शेतीच्या रांगा हे दृश्यच पर्यटकांना खुनावणारे आहे.

मराठमोळं जेवण ठरतेय पर्वणी

डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या या सौंदर्याबरोबर पावसाळी पर्यटनात ग्रामीण कृषी पर्यटनाचे महत्त्व वाढत असून, ग्रामीण भागात जाऊन निवास करणे, रांगडी मराठमोळी संस्कृती, पुरणपोळीसारखे खाद्यपदार्थ, लोक संस्कृती, गावरान प्रसिद्ध चाईतबाराची भाजी, मासवडी, थालपीठ, शेंगुळी पर्यटनासाठी पर्वणीच आहे. तसेच शेतावर जाऊन प्रत्यक्ष भातलावणी अर्थातच लावण्यात सहभाग घेणे, चिखलात फिरून मातीच्या स्पर्शाची अनुभूती घेणे याकडे सध्या पर्यटकांचा ओढा वाढला आहे.

पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध

वन विभागाकडून जंगली प्राणी पाहण्यासाठी टेहळणी टॉवर, जंगल सफारी, पर्यटकांना बसण्यासाठी पॅगोडा खुर्ची आदींसह विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून भक्त निवासासह परिसराचा विकास करण्यात आला आहे. येथे भातलावणीची सहल आयोजित करण्यात येते. निसर्गाचा आनंद, कृषी पर्यटन आणि स्थानिकांच्या हाताला रोजगार असे उद्देश या सहलींतून साधले जात आहेत.

हेही वाचा

सिलिंडरच्या स्फोटात युवती गंभीर; शिक्रापूर येथील दुर्घटना

मणिपूर हिंसाचारावर गोवा विधानसभेत चर्चा करण्यास सभापतींचा नकार

Back to top button