सिलिंडरच्या स्फोटात युवती गंभीर; शिक्रापूर येथील दुर्घटना | पुढारी

सिलिंडरच्या स्फोटात युवती गंभीर; शिक्रापूर येथील दुर्घटना

तळेगाव ढमढेरे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूरच्या भुजबळ मळा येथील विमल पॅलेस बिल्डिंगमधील तिसर्‍या मजल्यावर राहणारी युवती स्वयंपाकासाठी गॅस पेटवित असताना सिलिंडरचा भडका होऊन स्फोट झाला. यामध्ये युवती गंभीररीत्या भाजली. ही घटना गुरुवारी (दि. 3) घडली. वैष्णवी अनिल कोठाळकर (वय 20, सध्या रा. भुजबळ मळा, शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. अचलपूर, ता. अचलपूर, जि. अमरावती) असे गंभीर जखमी झालेल्या युवतीचे नाव आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरूर)च्या भुजबळ मळा येथील विमल पॅलेस बिल्डिंगमध्ये तिसर्‍या मजल्यावर राहणारी वैष्णवी कोठाळकर गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घरात स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवित होती. या वेळी सिलिंडरचा मोठा भडका होऊन अचानक स्फोट झाला. या वेळी मोठा आवाज होऊन घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने वैष्णवी गंभीररीत्या भाजून खाली कोसळली. शेजारील नागरिकांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून सिलिंडर बाहेर काढत जखमी वैष्णवीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार, पोलिस हवालदार संदीप कारंडे, आत्माराम तळोले, पोलिस जवान उद्धव भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या वेळी घरातील सर्वच साहित्य खाक झाल्याचे दिसले. या घटनेत वैष्णवी कोठाळकर ही गंभीर जखमी झाली. तर घराबाहेर असलेला प्रथमेश राजू सरोदे (वय 19, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. अंजनगाव सुर्जी, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) हा युवक किरकोळ जखमी झाला. ही युवती गंभीररीत्या जखमी झाल्याने तिला उपचारासाठी पुणे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा

पुणे : ग्रामीण भागात डोळ्यांच्या साथीचा प्रसार सुरूच

लोकसभेत गदारोळ, राजनाथ सिंह यांना मागच्या बाकावर जाऊन मांडावे लागले विधेयक

सांगली : संभाजी भिडेंना तात्काळ अटक करा; पुरोगामी संघटनांची मागणी

Back to top button