पुणे शहरातील दस्तनोंदणीची तपासणी करण्यासाठी नऊ पथके | पुढारी

पुणे शहरातील दस्तनोंदणीची तपासणी करण्यासाठी नऊ पथके

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांत मे ते जून या कालावधीत नोंदणी झालेल्या दस्तांची तपासणी करण्यासाठी नऊ तपासणी पथके गठीत केली आहेत, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळात दिली. दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत दस्तांच्या तपासणीबाबत दुय्यम निबंधक हवेली क्रमांक चार आणि नऊ या कार्यालयांमधील एक वर्षाच्या कालावधीतील दस्त नोंदणीची तपासणीसाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

पुण्यात बेकायदा दस्तनोंदणी होत असल्याबाबत आमदार सुनिल टिंगरे, रवींद्र धंगेकर आणि संजय जगताप यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना महसूलमंत्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की, अ‍ॅड. ज्ञानेश्वर कराळे यांनी 13 जून रोजी नोंदणी महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली. याबाबत नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने 21 जून रोजी पुणे विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक यांच्याकडून संबंधित दुय्यम निबंधक यांच्या कार्यकाळातील अहवाल मागविला आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत दस्तांच्या तपासणीबाबत दुय्यम निबंधक हवेली क्रमांक चार आणि नऊ या कार्यालयांमधील एक वर्षातील दस्तनोंदणीची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. नोंदणी महानिरीक्षकांनी पुणे शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमधील चालू वर्षी मे ते जून या कालावधीत नोंदणी झालेल्या दस्तांची तपासणी करण्यासाठी नऊ तपासणी पथके गठीत केली आहेत. हवेली क्र. चार आणि नऊ कार्यालयांमध्ये2020 पासून नोंदणी झालेल्या दस्तांची तपासणीचे नियोजन आहे असे विखे पाटील यांनी उत्तरात म्हटले आहे.

हिंजवडी सबस्टेशनचे काम लवकरच

पुणे जिल्ह्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेऊन हिंजवडी येथील सबस्टेशनचे काम लवकरच करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथेे सबस्टेशन बंद असल्याबाबतचा प्रश्न आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केला होता. फडणवीस म्हणाले की, हे उपकेंद्र बंद नाही. 400 के. व्ही. सह आणखी सहा अतिउच्च दाब उपकेंद्र बँक चार्ज करण्यात आली आहेत. उपकेंद्रसंलग्न वाहिन्या वन विभागाच्या मंजुरीअभावी कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत. 66 के.व्ही.पेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात येणार्‍या मनोर्‍याच्या व्याप्त जागेचा तसेच अतिउच्च दाब पारेषण वाहिन्यांच्या पट्ट्याखालील जमिनीच्या नुकसान भरपाईपोटी मोबदला देण्यासंदर्भात धोरण निश्चित केले आहे. सुधारित धोरणानुसार बाधित शेतकरी, जमीनधारकांना वाढीव मोबदला देण्यात येत आहेे.

हेही वाचा

रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी नगरमध्ये दामिनी पथक

नगर : मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणारा जेरबंद

ड्रग्ज प्रकरणी सरकार ॲक्शनमोडवर, औषध दुकानांमध्ये आता सीसीटीव्ही

Back to top button