रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी नगरमध्ये दामिनी पथक | पुढारी

रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी नगरमध्ये दामिनी पथक

नगर : पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन तरुणी, महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस ठाणे स्तरावर स्वतंत्र दामिनी पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी कोतवाली पोलिसांच्या दामिनी पथकाकडून आता शाळा, महाविद्यालय परिसरांत गस्त घालण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयांना दिलेल्या भेटीदरम्यान काही विद्यार्थिनींनी त्रास देणार्‍यांच्या तक्रारी केल्याने संबंधितांवर पोलिस निरीक्षक यादव यांनी कारवाई केली आहे.

शाळा, कॉलेज, होस्टेल, कोचिंग क्लास आदी ठिकाणी विद्यार्थिनींशी संवाद साधण्यासाठी आणि रोडरोमियोंवर कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मुलींच्या अडचणी, प्रश्न या पथकाकडून जाणून घेण्यात येणार आहेत. विद्यार्थिनींची काही तक्रार असल्यास ती सोडवण्यासाठी हे पथक मदत करणार असून, पोलिस निरीक्षक यादव यांनी स्वतंत्र कर्मचार्‍यांची या पथकात नियुक्ती केली आहे. तसेच, शाळा, महाविद्यालयाच्या वेळेत पथक गस्त करेल आणि मुलींना कोणी त्रास देत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

नगर कॉलेज, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रूपीबाई बोरा हायस्कूल, अंबिका विद्यालय केडगाव, चाँद सुलताना हायस्कूल, गुगळे माध्यमिक विद्यालय आदी शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पथकाची गस्त सुरू करण्यात आली आहे.

छेड काढणार्‍यांची अशी करा तक्रार
महिला व मुलींनी मोबाईलवरून विनाकारण मेसेज केल्यास, पाठलाग केल्यास, प्रवासात छेड काढणार्‍यांची तक्रार पोलिसांना द्यावी. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या 7777924603 या मोबाईल क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.

छेड काढणार्‍यांवर कॅमेर्‍याची नजर
महिला व मुलींचा पाठलाग करणे, छेड काढणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी पोलिस निरीक्षक यादव यांनी शाळा, महाविद्यालय परिसरात व्हिडीओ शूटिंग करण्याच्या सूचना पथकातील कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. चित्रीकरण करण्यासाठी एक कॅमेरा असेल. त्यामुळे महिला, मुलींची छेड काढणार्‍यांवर आता कॅमेर्‍याची नजर असणार आहे.

हेही वाचा :

नगरमध्ये पुन्हा घुमला भोंग्याचा आवाज ; आठवणी जाग्या

नगर : मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणारा जेरबंद

Back to top button