नगर : मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणारा जेरबंद | पुढारी

नगर : मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणारा जेरबंद

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  गावोगावी असलेल्या विविध टेलिकॉम कंपन्यांच्या मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणारा सराईत गुन्हेगार नगर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडला आहे. साथीदाराच्या मदतीने नगर शहरात एका ठिकाणी लपवून ठेवलेल्या तब्बल 10 लाख 95 हजारांच्या बॅटर्‍या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. विनोद परसराम खिळदकर (वय 31, रा. विठ्ठलाचे नांदूर, ता. आष्टी, जि. बीड) असे या आरोपीचे नाव आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारातील जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या मागील आठवड्यात चोरीला गेल्या होत्या. कंपनीचे प्रतिनिधी प्रदीप दत्तात्रय गारूडकर (रा. केडगाव) हे चिचोंडी पाटील शिवारातील सर्व जिओ कंपनीचे टॉवर चालू आहेत का, हे पाहण्यासाठी गेले असता त्याठिकाणी एक टॉवर बंद असल्याचे त्यांना आढळून आले.

त्यामुळे ते टॉवरची केबिन पाहण्यासाठी गेले असता कुलूप तुटलेले दिसले. आतमध्ये पाहाणी केली असता कॉस लाईट कंपनीच्या तीन बॅटर्‍या दिसल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी कामरगाव हद्दीतील टॉवरची देखरेख करणारे अनिल कदम यांना फोन करून माहिती दिली.
कदम यांनीही त्यांच्या हद्दीतील एका टॉवरच्या व्हीजन कंपनीच्या पाच बॅटर्‍या चोरीला गेल्याचे सांगितले. त्यामुळे गारुडकर यांनी 24 जुलै रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी उपनिरीक्षक युवराज चव्हाण, उपनिरीक्षक रणजित मारग, हालदार सुभाष थोरात, कॉन्स्टेबल कमलेश पाथरुट, राजू खेडकर, संभाजी बोराडे, विशाल टकले यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सांंगितले.

त्यानुसार पथकाने मोबाईल टॉवरकडे जाण्यार्‍या रस्त्यांवरील सीसीटीव्हींची पाहणी केली. त्यामध्ये दोन इसम स्कूटीवर बॅटर्‍या घेऊन जाताना दिसले. तांत्रिक विशलेषणाद्वारे तपास करून गुन्हेगाराचे नाव निश्चित केले. त्यानुसार विनोद खिळदकर याला त्याच्या राहत्या घरी विठ्ठलाचे नांदूर येथे जाऊन पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. तसेच साथीदार सागर धर्मा गायकवाड (रा. विठ्ठलाचे नांदूर, ता. आष्टी जि.बीड) याच्या समवेत नगर व बीड जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे केले असल्याचे सांगितले. त्यात चोरलेला मुद्देमाल नगर शहरातील माळीवाडा येथील लक्ष्मी लॉजजवळ एका गाळ्यामध्ये ठेवलेला असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास सोबत घेऊन माळीवाडा येथे लक्ष्मी लॉजशेजारी गाळ्यामध्ये जाऊन पाहणी केली. तेथे तब्बल 10 लाख 95 हजारांच्या एकूण 44 छोट्या- मोठ्या बॅटर्‍या आढळून आल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.

हेही वाचा :

ड्रग्ज प्रकरणी सरकार ॲक्शनमोडवर, औषध दुकानांमध्ये आता सीसीटीव्ही

Diabetes care | पावसाळ्यात मधुमेह रूग्णांनी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या अधिक

Back to top button