सांगवी: जिल्हा रुग्णालयातील असुविधांमुळे रूग्ण बेजार | पुढारी

सांगवी: जिल्हा रुग्णालयातील असुविधांमुळे रूग्ण बेजार

 पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : सांगवीतील जिल्हा रुग्णालयच व्हेंटिलेटरवर असून, सोयीसुविधांच्या अभावामुळे रुग्ण बेजार झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी रुग्णांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, रुग्णालय आवार परिसरात कचर्‍याचे ढीग असल्याने रुग्णांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.

जागोजागी कचर्‍याचे ढीग
जिल्हा रुग्णालयाकडे जाणार्‍या बाबूराव घोलप विद्यालयाच्या लागून असलेल्या मैदानाच्या बाजूला जागोजागी कचर्‍याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे नाकाला रुमाल लावूनच रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करावा लागतो. तसेच रुग्णालय प्रतीक्षालयाच्या आवारातील धोकादायक झाडे वाकली आहेत. त्यामुळे केव्हाही अपघात होण्याची शक्यता आहे. या धोकादायक झाडाची छाटणी वेळोवेळी करणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयात रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी असते. तर रुग्णालयाच्या भिंती गुटखा-तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भरून गेल्या आहेत.

शिवभोजन केंद्र बंद
रुग्णालयाच्या आवारात पाण्याची सोय नाही. तसेच स्वच्छतागृहाअभावी रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयातील शिवभोजन केंद्र बंद आहे. त्यामुळे वाजवी दरात पोळी भाजी खाणे रुग्णांच्या नातेवाईकांना कठीण होऊन बसले आहे. जागेअभावी हे केंद्र बंद करण्याची वेळ बचत गटावर आली असल्याचे केंद्र सहाय्यकांचे म्हणणे आहे. जिल्हा रुग्णालयात सर्वसामन्यांना सुविधा पुरवल्या जात नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

माझ्या मुलीला डिलिव्हरीसाठी आणण्यात आले; परंतु या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गैरसोय दिसून येत आहे. येथील पोळी भाजी केंद्रही बंद आहे. परिणामी बाहेरचं जेवण परवडत नाही. येथे पोळी भाजी केंद्र असायला हवे. तसेच पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहदेखील असायला हवे.
                                        – अनिता गायकवाड, रुग्णाचे नातेवाईक

रुग्णालयाच्या इमारतीसमोरील धर्मशाळेच्या आवारात दोन मोठी झाडे वाळलेली आहेत. पावसाळ्यात अशी झाडे पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे झाडे तोडणे गरजेचे आहे.
                                            – सुरेश सकट, सामाजिक कार्यकर्ते

Back to top button