पुणे : मेडिक्लेम नाकारणार्‍या विमा कंपनीला दणका | पुढारी

पुणे : मेडिक्लेम नाकारणार्‍या विमा कंपनीला दणका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आजार लपवल्याचे कारण देत मेडिक्लेम नाकारणार्‍या विमा कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला. कंपनीने 4 लाख 22 हजार 501 रुपये 30 जून 2022 पासून 7 टक्के व्याजाने द्यावे, असा आदेश आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिला आहे. नुकसान भरपाईपोटी 10 हजार, तक्रारीच्या खर्चापोटी 3 हजार रुपये द्यावे, असे ही आदेशात नमूद केले आहे.

याबाबत लोणीकंद येथे वास्तव्यास असणार्‍या व्यक्तीने विमा कंपनीविरुद्ध ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांनी मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली होती. या पॉलिसीमध्ये तक्रारदारांसह त्यांची पत्नी, दोन मुले यांचा समावेश होता. या पॉलिसीसाठी तक्रारदारांनी 14 हजार 489 रुपये भरले होते. 24 ऑगस्ट 2021 ते 23 ऑगस्ट 2022 असा या पॉलिसीचा कालावधी होता. या पॉलिसीअंतर्गत 5 लाख रुपयांचे संरक्षण देण्यात आले होते. 4 मे 2022 रोजी तक्रारदारांचा कार्यालयातून घरी परतताना अपघात झाला.

या अपघातात तक्रारदारांच्या कोपराला आणि दोन्ही हातांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली होती. 24 मे 2022 रोजी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांनी कंपनीकडे क्लेम दाखल केला असता, 30 मे 2022 रोजी तक्रारदारांनी सोरायसीसचा आजार लपवल्याचे कारण देत कंपनीने क्लेम नाकारला. त्यानंतर तक्रारदारांनी कंपनीच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधून 5 जुलै 2022 रोजी पुन्हा क्लेम दाखल केला. मात्र, हा क्लेमदेखील 9 जुलै रोजी कंपनीने नाकारला. त्यामुळे तक्रारदारांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल करत 4 लाख 22 हजार 501 रुपये व्याजासह परत मिळावे, अशी मागणी केली.

याबाबत कंपनीला नोटीस पाठवूनदेखील कोणीही हजर न झाल्याने आयोगाने एकतर्फी आदेश पारीत केला. या प्रकरणी कंपनीने तक्रारदारांची तक्रार चुकीची आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करणे गरजेचे होते. परंतु, संधी देऊनही कंपनीकडून कोणीही हजर झाले नाही. त्यामुळे तक्रारदार मागणी केलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी पात्र असल्याचे सांगत आयोगाने आदेश दिला.

हेही वाचा

तेलंगणा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज कोल्हापूर-सांगली दौर्‍यावर’

कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेते उद्या दिल्लीला

गेल्या 9 वर्षांत अतिवृष्टीचे देशात 17 हजार बळी

Back to top button