पंतप्रधानांच्या कार्यक्रमातून नदीसुधार योजनेचे भूमिपूजन वगळले | पुढारी

पंतप्रधानांच्या कार्यक्रमातून नदीसुधार योजनेचे भूमिपूजन वगळले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार योजनेचे भूमिपूजन करण्यात येणार होते. तसेच, मोशी कचरा डेपोत बायोमायनिंग प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र, हे दोन्ही प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारच्या (दि. 1) कार्यक्रमातून वगळण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते महापालिकेच्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व भूमीपूजन केले जाणार होते. त्यात मोशी कचरा डेपो येथील वेस्ट टू एनर्जी आणि बायोमायनिंग या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार होते.

तसेच, मुळा नदी सुधार प्रकल्पातील वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंतच्या 8.80 किलोमीटर अंतराच्या एका बाजूच्या पात्राच्या कामाची सुरूवात करण्यात येणार होती. पंतप्रधान आवास योजनेतील बोर्‍हाडेवाडी व चर्‍होली येथील गृहप्रकल्पातील सदनिकांचे वितरण करणे. डुडूळगाव येथील गृहप्रकल्पाची भूमिपूजन करण्यात येणार होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने जय्यत तयारीही केली होती.

मात्र, या कार्यक्रमातून मुळा नदी सुधार योजना व बायोमायनिंग तसेच, चर्‍होलीतील घरांचे वितरण हे कार्यक्रम वगळण्यात आले आहेत. मुळा व मुठा नदी सुधार योजनेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुण्यात भूमीपूजन झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात त्याच प्रकल्पाचे पुन्हा भूमीपूजन न करण्याचा निर्णय झाला; तसेच, बायोमायनिंग प्रकल्प मोठा नसल्याने तो कार्यक्रमात रद्द करण्यात आला. तर, चर्‍होली येथील गृहप्रकल्पाचे काम अद्याप अर्धवट असल्याने तो प्रकल्प कार्यक्रमातून वगळण्यात आला आहे.

हेही वाचा

देवाचा धावा करा; आमची धरणे भरू द्या ! केसरकरांना छगन भुजबळांचा मिश्किली टोला

सांगली :  बनावटगिरीचा रानबाजार; खतांत बगॅस, थर्मलची राख, खाणमाती

डांबरात चिकटली कुत्री; अग्निशमन जवानांनी केली प्रयत्नाची शर्थ

Back to top button