डांबरात चिकटली कुत्री; अग्निशमन जवानांनी केली प्रयत्नाची शर्थ | पुढारी

डांबरात चिकटली कुत्री; अग्निशमन जवानांनी केली प्रयत्नाची शर्थ

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रस्त्यावर मोकाट फिरणार्‍या मुक्या प्राण्यांना माणसांनी तयार केेलेला धोका कळणार कसा? रस्त्यावर एका ठिकाणी वितळलेल्या डांबराचा ड्रम ठेवण्यात आला होता. थंडीपासून बचाव करण्यासाठी गेलेली दोन कुत्री त्यात चिकटून बसली. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत त्यांची जिवंत सुटका केली. कोंढवा भागातील ही अंगावर शहारे आणणारी घटना आहे.
कोंढवा भागात पारगेनगर सोसायटी आहे. या सोसायटीच्या मागील बाजूस रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. एका ड्रममध्ये डांबर ठेवण्यात आले होते. पावसामुळे रस्त्याचे काम काही काळ बंद होते. त्यामुळे डांबराचे हे ड्रम असेच उघड्यावर पडून होते. त्यात कुणी अशा प्रकारे अडकेल अशी सुतराम कल्पनाही आली नसते.

परंतु पावसामुळे जागोजागी झालेल्या चिखलापासून सुटका मिळावी व बसायला उबदार जागा मोकाट कुत्री शोधत होती. ते नेमके ड्रममधल्या डांबरावर जाऊन बसले. त्यामुळे काही केल्या त्यांना बाहेर येता येईना. कुत्र्याचे केकाटने ऐकून नागरिक गोळा झाले. नागरिकांनी त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य नव्हते. त्यामुळे याबाबतची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दिली. त्यानंतर जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष आनंद अडसूळ यांच्याशी संपर्क साधला. या संस्थेचे दोन सदस्य तेथे पोहोचले होते. जवानांनी सर्क्युलर सॉ अग्निशमन उपकरण वापरून ड्रमचे दोन भाग केले. त्यानंतर अग्निशमन वाहनातील बचाव साहित्यांचा उपयोग करून तसेच तेलाचा वापर करून तासाभरात दोन श्वानांची सुखरूप सुटका केली.

कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रातील तांडेल नीलेश लोणकर, वाहनचालक दीपक कचरे, तसेच जवान रवी बारटक्के, सागर इंगळे, अनिकेत गोगावले, मनोज गायकवाड, संतोष माने आणि वाईल्ड एनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे सदस्य लक्ष्मण वाघमारे, संदेश रसाळ यांनी ही कामगिरी केली. स्थानिक रहिवासी प्रतिभा पवार यांनी अग्निशमन दलाकडे वेळीच माहिती दिल्याने अग्निशमन दल, प्राणिमित्र संस्थेने श्वानाची सुटका वेळेवर केल्याने दोन श्वान बचावले.

जवानांनी सर्क्युलर
सॉ अग्निशमन उपकरण वापरून ड्रमचे दोन भाग केले. त्यानंतर अग्निशमन वाहनातील बचाव साहित्यांचा उपयोग करून तसेच तेलाचा वापर करून तासाभरात दोन श्वानांची सुखरूप सुटका केली.

हेही वाचा :

कोल्हापूर : धरणातील पाण्याचे प्रमाण कसे मोजतात?

पुणे : सराईत गुन्हेगार हद्दपार

Back to top button