सांडपाण्यामुळे भीमा नदीचे पावित्र्य धोक्यात | पुढारी

सांडपाण्यामुळे भीमा नदीचे पावित्र्य धोक्यात

अशोक शेंगाळे

भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे अभयारण्य असल्याने निसर्गप्रेमींचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. पवित्र शिवलिंगावर चढवलेले हार, फुले यांचे ढीग पवित्र भीमापात्रात व घाणीत टाकलेले आढळत आहेत. यातच मंदिराजवळ भीमापात्रात स्थानिकांचे सांडपाणीदेखील सोडल्यामुळे भीमा नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पायरी मार्गात पाणी व गाळाचा राडारोडा वाहत मंदिराभोवती गाळमिश्रित
पाणी व पाण्याचे डबके पाहवयास मिळत आहेत. भीमाशंकर येथे प्लास्टिकबंदी असली तरी पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व प्लास्टिक पिशव्या या बाहेरून आणल्या जातात.

मंदिरापासून बस स्थानकापर्यंत तसेच पुढे एमटीडीसी ते वाहनतळ अशा 4 ते 5 किलोमीटरपर्यंत मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी प्लास्टिक बाटल्यांचा मोठा ढीग पाहवयास मिळत आहे. यात मंदिर परिसरात भीमापात्रात येथील रहिवासी लोकांच्या शौचालय व मोरीचे पाणी हे पवित्र भीमापात्रात जात असल्याने येथील पावित्र्य धोक्यात आले आहे. पायरी मार्गात पाणी व गाळाचा राडारोडा वाहत मंदिराभोवती गाळमिश्रित पाणी व पाण्याचे डबके पाहवयास मिळत आहेत.

प्लास्टिक हे अविघटनशील घटक असल्याने तो कुजून जात नाही. हे प्लास्टिक वन्यजीवांच्या आहारात आल्यास त्यांना धोका निर्माण होत आहे. बस स्थानकापासून मंदिराच्या पायर्‍यांपर्यंत दोन्ही बाजूने दुकाने व हॉटेल आहेत. यामुळे येथील सांडपाणी इतरत्र पसरत असल्याने तसेच ओल्या कचर्‍यामध्ये प्लास्टिक, फुलांचे हार, कुजलेले खाद्यपदार्थ याची दुर्गंधी वाढल्याने या ठिकाणी असणारी मोकाट जनावरे, कुत्री यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा काही अंशी परिणाम भाविक व नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

कचरागाडी बंद
भीमाशंंकर परिसरातील केरकचरा उचलण्यासाठी असणारी देवस्थानची कचरागाडी बंंद अवस्थेत आहे. यामुळे वन्यजीव विभाग, देवस्थान समिती व प्रशासन कूचकामी ठरले आहे.

हेही वाचा :

पुरंदरचा वाटाणा बाजारात दाखल ; खरेदीसाठी व्यापार्‍यांची गर्दी

पुणे : मनसेने पेटवले खड्डे ; भरपावसात केले खड्डे पेटवा आंदोलन

Back to top button