पुरंदरचा वाटाणा बाजारात दाखल ; खरेदीसाठी व्यापार्‍यांची गर्दी | पुढारी

पुरंदरचा वाटाणा बाजारात दाखल ; खरेदीसाठी व्यापार्‍यांची गर्दी

दिवे : पुढारी वृत्तसेवा : वाटाणा हे पुरंदर तालुक्यातील मुख्य पीक आहे. या पिकातून दरवर्षी तालुक्यात मोठी उलाढाल होते. राज्यभरातील खवय्ये पुरंदरच्या गोड वाटाण्याची आवर्जून वाट पाहत असतात. या वर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे जुलैअखेरीस वाटाणा बाजारात दाखल झाला आहे. हडपसर बाजारात वाटाण्याला दहा किलोला दोन हजार रुपये उच्चांकी भाव मिळाला. भाव अधिक असूनही खरेदीसाठी व्यापार्‍यांनी गर्दी केली होती.

वाटाण्याचे उत्पादन मध्य प्रदेश, ग्वाल्हेर, दिल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्रात पारनेर आणि पुरंदर भागात वाटाण्याची पेरणी केली जाते. मात्र, पुरंदरचा वाटाणा अप्रतिम चवीने राज्यात प्रसिद्ध आहे. या भागात अर्कल व गोल्डन या जातीच्या वाटाण्याची पेरणी केली जाते. पुणे, मुंबई येथील बाजारपेठेत बाहेरील राज्याच्या वाटाण्याच्या तुलनेत येथील वाटाण्याला जास्तीचा बाजारभाव मिळतो. फळबागेव्यतिरिक्त तालुक्यात वाटाण्याच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. स्थानिक सासवड बाजारपेठेत पेण, मुंबई, सांगली, सातारा, महाड येथील व्यापारी खरेदीसाठी येत असतात.

दिवे येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र झेंडे व सारिका झेंडे या दाम्पत्याने एक एकर क्षेत्रावर 15 जूनला थोडाफार पाऊस झाल्यानंतर वाटाण्याची पेरणी केली. सध्या तालुक्यात एकीकडे वाटाण्याची पेरणी सुरू आहे, तर राजेंद्र व सारिका झेंडे यांच्या वाटाण्याची तोडणी सुरू आहे. पावसाने उघडीप दिल्याने या दाम्पत्याने तुषार सिंचनाचा वापर करीत दर्जेदार वाटाण्याचे उत्पादन घेतले आहे. पहिल्याच तोड्याला तब्बल पाचशे किलो माल सापडेल, असे झेंडे यांनी सांगितले. हंगामात पहिल्यांदाच वाटाणा बाजारात दाखल झाल्याने पहिल्याच दिवशी हडपसर बाजारात मालखरेदीसाठी व्यापार्‍यांनी गर्दी केली होती. तब्बल दोनशे किलो माल राजेंद्र नेवसे, नीलेश दरशिले, नीतेश काळे यांनी उच्चांकी भावाने खरेदी केला. सासवडच्या वाटाण्याला ग्राहकांकडून विशेष मागणी असते. त्यामुळे पेण, दिव येथून सासवड येथे खरेदीसाठी येतो, असे पेण येथील व्यापारी मीनाक्षी ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा :

भीमाशंकर येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद ; अधिक श्रावण यात्रेच्या सुरक्षेचा प्रश्न

पुणे : शिवाजीनगर , हडपसरची हवा सर्वाधिक प्रदूषित

Back to top button