चिंता मिटली ! खडकवासला, कळमोडी 100% भरले | पुढारी

चिंता मिटली ! खडकवासला, कळमोडी 100% भरले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील भीमा खोर्‍यांतर्गत असलेल्या कुकडी, मुळशी तसेच मुळा-मुठा या नद्यांच्या खोर्‍यात असलेल्या सर्व 26 धरणांमध्ये आतापर्यंत सुमारे 37.89 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, या भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला, तरच ही धरणे शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. भीमा खोर्‍यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात उशिरा म्हणजेच जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली.

त्यामुळे पाण्याचा साठा हळूहळू वाढू लागला. अर्थात, जून महिन्यापासूनच पावसाने जोर धरला असता, तर आतापर्यंत धरणातून विसर्ग सुरू झाला असता. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जोमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे खडकवासला साखळी प्रकल्पातील खडकवासला तसेच कळमोडी ही कमी क्षमता असलेली धरणे नुकतीच भरलेली आहेत. सुमारे 19 धरणांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झालेला आहे. सर्वच धरणे 100 टक्के (पूर्ण क्षमतेने) भरण्यासाठी अजून मोठ्या पावसाची गरज आहे.

कृष्णा खोरे धरणातील पाणीसाठा वाढला

कृष्णा खोर्‍यात गेल्या दहा दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने धरणातील पाण्याच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असले, तरी निर्माण झालेली तूट या दहा दिवसांतील पावसाने भरून काढली आहे. विभागातील अनेक धरणे सरासरी 80 टक्केच्या आसपास भरली आहेत. मात्र, येरळवाडी धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने ते अजूनही कोरडेच आहे.
कृष्णा खो-यात पडत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरण 100 टक्के भरले असून, या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पाठोपाठ वारणावती, कासारी, धोम बलकवडी, तारळी या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस जोरदार पडत असल्यामुळे या धरणातूनदेखील विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

नाशिक : समुपदेशनानंतर मामाचा जावयावर चाकू हल्ला

चांगली बातमी ! महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये 235 वाघ वाढले

Back to top button