पिंपरी : इलेक्ट्रिक वाहनांना आले चांगले दिवस; महापालिकेकडून प्रोत्साहन | पुढारी

पिंपरी : इलेक्ट्रिक वाहनांना आले चांगले दिवस; महापालिकेकडून प्रोत्साहन

मिलिंद कांबळे

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वायू व ध्वनी प्रदूषणात भर पडत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास भर दिला आहे. तसेच, नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे 181 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वसले आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे पोहचल्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे वाहनांची संख्या सातत्याने वाढतच आहे. शहरात तब्बल 24 लाख वाहनांची आरटीओकडे नोंद आहे. लाखो वाहनांमुळे शहरात वायू व ध्वनी प्रदूषण वाढत आहे.

राज्य शासनाच्या 20 ऑगस्ट 2021 च्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासून महापालिकेकडून करण्यात येत आहे. वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्यात येत आहे. महापालिकेत वेगवेगळ्या प्रकाराची 500 पेक्षा अधिक वाहने आहेत. ती पेट्रोल व डिझेलवरील वाहने कमी करून इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविण्यावर पालिका भर देत आहे.

इलेक्ट्रिक मोटार कारची किंमत 14 ते 16 लाख असल्याने ती वाहने भाडे तत्वावर घेण्यात येत आहेत. आतापर्यंत 79 वाहने घेण्यात आली आहे. ती वाहने अधिकारी वापरत आहेत. एकूण 95 वाहने घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यापैकी 54 वाहने चालकाविना व 25 वाहने चालकांसह आहेत. वाहनांचा दरमहा खर्च 43 हजार 807 ते 53 हजार 800 रुपये इतका आहे. तर, चालकासह असलेल्या वाहनाचा दर दिवसाला 1,939 रूपये खर्च आहे. या वाहनांची देखभाल, दुरूस्ती व चार्जिंग पुरवठादाराकडून केला जात आहे. या वाहनांमुळे वायू व ध्वनी प्रदूषण कमी होण्यास सहाय्य होते.

महापालिकेचा स्वतंत्र सेल

महापालिकेने इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास अधिक पसंती दिली आहे. सध्या अधिकार्‍यांसाठी ती वाहने घेतली आहेत. पदाधिकार्‍यांनीही त्या प्रकाराची वाहने घेण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या वतीने ई-रिक्षांना प्रोत्साहन देण्यासाठी 30 हजारांचे अनुदान देण्यात येत आहे. तसेच, शहरात विविध 21 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भात कार्यवाहीसाठी महापालिकेने इलेक्ट्रिक व्हेईकल सेलची स्थापना केली आहे, असे महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी सांगितले.

पीपीपी तत्वावर 21 ठिकाणी चार्जिंग स्टेशन

महापालिकेच्या वतीने पीपीपी तत्वावर शहरातील विविध भागात 21 चार्जिंग स्टेशन बांधण्यात येत आहेत. तेथील चार्जिंगचा दरही किफायतशीर असणार आहेत. त्या सुविधेमुळे इलेक्ट्रिक वाहनचालकांना आपले वाहन शहरात कोठेही व कधीही चार्ज करून घेता येणार आहे. हे स्टेेशन उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच, महावितरण आणि मेट्रोने शहरात काही ठिकाणी चार्जिग स्टेशन सुरू केले आहेत. महापालिकेने भोसरी, निगडी, नेहरूनगर येथील पीएमपीएमएलच्या डेपोवर चार्जिंग स्टेशन तयार करून दिले आहेत.

चार्जिंग स्टेशन उभारल्यास मिळकतकरात सवलत

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास महापालिकेच्या वतीने मिळकतधारकांस 2 टक्के आणि हाऊसिंग सोसायटीला 5 टक्के मिळकतकरात सवलत दिली जात आहे. सोसायटीच्या जीम, क्लब हाऊस, जलतरण तलाव या सामायिक मिळकतीला 5 टक्के सवलत आहे. त्याचा लाभ शहरातील काही मिळकतधारक घेत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी अनुदान

महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी इलेक्ट्रिक वाहन वापरावे म्हणून महापालिका अशी वाहने खरेदीसाठी अनुदान देते. तसेच, शहरातील 5 हजार इलेक्ट्रिक रिक्षांना प्रत्येकी 30 हजारांचे अनुदान देण्यात महापालिकेने सुरुवात केली आहे. त्या संदर्भातील माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत वाढ

विजेवर वाहन धावत असल्याने इंधनाच्या दरात बचत होते. तसेच, प्रदूषण होत नसल्याने नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत असल्याचे चित्र आहे. सन 2020-21 वर्षांत एकूण 97 हजार 213 वाहनांपैकी 1 हजार 432 वाहने ही इलेक्ट्रिक होती. तर, सीएनजीवरील वाहनांची संख्या 12 हजार 794 होती. सन 2021-22 वर्षांत 1 लाख 7 हजार 420 वाहनांची नोंद झाली. त्यापैकी इलेक्ट्रिक 6 हजार 908 वाहनांची नोंद झाली. तर, सीएनजीची वाहने 44 हजार 907 आहेत. प्रदूषणविरहीत वाहने खरेदीस नागरिक पसंती देत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा

पुणे महापालिकेकडून निधीची उधळपट्टी ! येरवड्यात पथदिव्यांचे सुस्थितीतील ब्रॅकेट बदलले

पिंपरी : एटीएम कार्डची अदलाबदल करीत फसवणूक

Back to top button