थकीत एफआरपीप्रश्नी 86 कारखान्यांना नोटिसा | पुढारी

थकीत एफआरपीप्रश्नी 86 कारखान्यांना नोटिसा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात संपलेला ऊस गाळप हंगाम 2022-23 मधील शेतकर्‍यांच्या उसाच्या एफआरपीच्या सुमारे 817 कोटी रुपयांच्या थकीतप्रश्नी 86 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांलयाने नोटिसा बजावल्या आहेत. तीन टप्प्यांत होणार्‍या सुनावणींमध्ये संबंधित कारखान्यांचे म्हणणे ऐकून घेऊन तत्काळ रक्कम न दिल्यास त्या साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचा हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे. ऊस गाळप हंगामातील उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एकूण देय एफआरपी रकमेचा आकडा ऊस तोडणी वाहतूक खर्चासह 35 हजार 524 कोटी रुपये होता.

त्यापैकी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ऊस तोडणी खर्चासह 34 हजार 707 कोटी रुपये जमा झालेले आहेत. त्यामध्ये 100 टक्के उसाची एफआरपीची रक्कम 125 साखर कारखान्यांनी दिलेली आहे. मात्र, उर्वरित 86 कारखान्यांकडे अद्यापही 817 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम तत्काळ देण्यासाठी आयुक्तालयाकडूनही पाठपुरावा सुरू आहे.

मध्यंतरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेत या संपूर्ण एफआरपीची रक्कम न देणार्‍या कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आर.आर.सी.) जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी केली होती. साखर कारखान्यांना नोटिसा काढण्यात दिलेल्या आहेत. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांमध्ये करार झाल्याचे काही कारखान्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यावेळी सुनावणीदरम्यान त्यांनी दिलेल्या लेखी म्हणण्यामध्ये कराराचा तपशील, ठिरल्या टप्प्यानुसार किती रक्कम दिली याची माहिती आयुक्तालयाकडून घेतली जाणार आहे. रक्कम देण्यास टाळटाळ करणार्‍या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी दिली.

सुनावणी तारीख….कारखाने…थकीत एफआरपी
28 जुलै…………19……….406.53 कोटी
31 जुलै…………22……….204.45 कोटी
1 ऑगस्ट……….45………..205.54 कोटी
एकूण कारखान…..86………..816.52 कोटी

हेही वाचा :

Sale for Prostitute : मुलींचे अपहरण करून वेश्या व्यवसायासाठी विक्रीचे भयानक वास्तव

पुणे : ‘सर्व्हन्ट्स सोसायटी ऑफ इंडिया’मध्ये तक्रारींचा नवा अध्याय सुरू

Back to top button