Sale for Prostitute : मुलींचे अपहरण करून वेश्या व्यवसायासाठी विक्रीचे भयानक वास्तव | पुढारी

Sale for Prostitute : मुलींचे अपहरण करून वेश्या व्यवसायासाठी विक्रीचे भयानक वास्तव

विजय लाड

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा; Sale for Prostitute : बांग्लादेशी तरुणीला नोकरीचे आमीष दाखवून मुंबईत आणून तिचा दीड लाख रुपयांत सौदा करत वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेने या तरुणीची सुटका करत तीन वेश्या दलालांना अटक केली आहे. या घटनेच्या निमित्ताने भाल्याच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण असे अनेक प्रश्न कथित सभ्य समाजासमोर आ वासून उभे ठाकले आहेत. अशा किती तुळसा मुंबईच्या वेश्यालयात असतील? पुढेही किती तुळसा या वेश्यालयांमध्ये येतील? आपल्या या मुलींना कधी न्याय मिळेल? की न्यायाच्या प्रतीक्षेत मृत्यू झालेल्या तुळासाप्रमाणेच त्यांचाही अंत होईल?

१९८२ मध्ये १३ वर्षीय तुळसा भिरदुज थापा नावाच्या मुलीचे नेपाळमधून अपहरण करण्यात आले. तिला मुंबईच्या वेश्यालयात विकण्यात आले. एका वर्षात तिला मुंबईतील तीन वेश्यालयात विकण्यात आले होते. या दरम्यान सुमारे २ हजार लोकांनी तिच्यावर अनन्वित शारीरिक अत्याचार केले. त्यामुळे तिला अनेक आजार जडले. यातच तिचा मृत्यू झाला. Sale for Prostitute

तुळसाला जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी जेजे हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉ. ईश्वर गिलाडा यांनी हे प्रकरण लावून धरले. त्यानंतर तत्कालिन पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी मुंबईतील अनेक वेश्यालयांवर धाडी टाकल्या. वेश्यालय चालवणाऱ्या महिला, मुलींची विक्री करणारे दलाल, शासकीय अधिकारी, पोलिस दलातील काही व्यक्ती आदी लोकांच्या छुप्या नेटवर्कला उद्ध्वस्त केले. त्यानंतर तुलासाला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या ३२ आरोपींवर खटला चालला. यावेळी डॉ. गिलाडा यांनी आरोपींना शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तुलासाच्या वडिलांना आणि मामाला मुंबईत आणून साक्षी नोंदवल्या. परंतु, तुलासाला न्याय मिळाला नाही. यावेळी न्यायालयाने पोलिस आणि सरकारी वकील यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. या प्रकरणातील अपयशाला ते कारणीभूत असल्याचे सांगितले होते.

Sale for Prostitute : अल्पवयीन मुलींची नवरी म्हणून विक्री

असेच एक प्रकरण गुजरातमधून उघडकीस आले आहे. एका टोळीने १५ अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन त्यांना त्यांच्यापेक्षा दुप्पट, तिप्पट वयाने मोठ्या असलेल्या अनेक लोकांना नवरीच्या स्वरुपात विकले आहे. अशोक पटेल हा या टोळीचा म्होरक्या असून त्याने सुमारे १५ अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये विक्री केल्याचे समोर आले आहे. गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील कनबा गावातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीच्या तपासातून या टोळीचा शोध लागला. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली.

पिपल्स हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासचिव आणि संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा यांनी सांगितले, की अल्पवयीन मुलींवर अनन्वीत अत्याचार करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे. तसेच ही प्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावीत. त्यामुळे दोषींना लगेच शिक्षा होईल आणि जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहील. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कायद्यात सुधारणा करण्यात आली. परंतु, अजूनही अशी माणुसकीला काळिमा फासणारी प्रकरणे घडत आहेत. त्यामुळे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

यासंदर्भात डॉ. गिलाडा म्हणाले, की कोणत्याही अल्पवयीन मुलीसोबत अशा घटना घडू शकतात. मुंबईच्या एका वेश्यालयात तमिळनाडूतील एका मुलीला विकण्यात आले होते. ती दररोज एक संदेश लिहून एका दगडाला बांधून वेश्यालयाबाहेर फेकायची. त्यानंतर एका व्यक्तीने तो संदेश वाचला. तिच्या आईवडिलांना याची माहिती दिली. तिचे वडील तमिळनाडू पोलिस दलात अधिकारी होते. त्यानंतर मुंबईतील वेश्यालयात धाडी टाकण्यात आल्या. यावरुन दिसून येते की कोणत्याही मुलीसोबत अशा घटना घडू शकतात. आपले पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री गुजरात राज्यातील आहेत. त्यांच्या राज्यात अशा घटना घडत असतील तर काय इतर राज्यांचा विचार न केलेलाच बरा.

Sale for Prostitute : मुंबईतील वेश्यालये आजारांचे महाद्वार

मुंबईतील वेश्यालये अनेक आजारांचे महाद्वार असल्याचे दिसून येते. तुळसा सुमारे वर्षभर मुंबईच्या वेगवेगळ्या वेश्यालयात होती. यावेळी सुमारे २ हजार लोकांनी तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. या दरम्यान तिला अनेक दुर्धर आजारांनी वेढले. तिला अनेक संसर्गजन्य रोगांची लागण झाली होती. लैंगिक संबंधांमधून प्रसारित होणाऱ्या रोगांचीही लागण तिला झाली होती. यावर उपचार करण्यासाठी तिला प्रथम एका दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. परंतु, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर तिला जेजे रुग्णालयात दाखल केले. येथे तिची प्रकृती सुधारली. परंतु, अखेर क्षयरोगाने तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा :

Mumbai Crime : बांग्लादेशी तरुणीची वेश्या व्यवसायासाठी दीड लाखांत विक्री 

संगमनेर : महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून अत्याचार

Back to top button