नवले पुलाजवळ उपायांमुळे अपघातांचे प्रमाण घटले | पुढारी

नवले पुलाजवळ उपायांमुळे अपघातांचे प्रमाण घटले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात मागील तीन वर्षांत 34 अपघात झाले. या परिसरात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधिमंडळात केला. कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे यांनी नवले पूल परिसरात सातत्याने होणार्‍या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तारांकित प्रश्न विचारला होता, त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. फडणवीस म्हणाले, ‘नवीन कात्रज बोगदा येथे वाहतूक तपासणी नाका चौकी उभारण्यात येऊन तेथे मनुष्यबळ तैनात आहे.

सातारा, मुंबई मार्गिकांसाठी एक गस्त वाहन तैनात असून, एक अधिकारी, दोन अंमलदार यांची नेमणूक केली आहे. नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान वेगमर्यादा ताशी 60 कि. मी. वरून 40 कि. मी. करण्यात आली आहे.’ या रस्त्यावर नवले पुलाजवळ नवीन हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. या उपाययोजना केल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एक चौकशी समिती गठीत केली होती. या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आवश्यक ठिकाणी डिजिटल फलक, सूचना फलक लावण्यात आले. अतिक्रमण काढून रस्ता रुंद करण्यात आला. या परिसरात जास्त उंचीच्या रम्बल पट्ट्या, मार्गिका आखणी, आगमन आणि निर्गमन केंद्रे तयार केली आहेत. नर्‍हे सेल्फी पॉइंट येथे वेग नियंत्रण कॅमेरा बसविण्यात आला असून, त्याद्वारे 24 तास भरधाव वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button