पुण्यात पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यानिमित्त जय्यत तयारी | पुढारी

पुण्यात पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यानिमित्त जय्यत तयारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. या वेळी मोदी विविध विकासकामांचे उद्घाटनदेखील करणार आहेत. 1 ऑगस्टला होणार्‍या या कार्यक्रमासाठी प्रशासकीय तसेच सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या असून, कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी दोन्ही यंत्रणा बैठका घेत आहेत. विविध अधिकार्‍यांना जबाबदारीचे वाटपही करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी पुण्यात आल्यानंतर दगडूशेेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेणार आहेत. स. प. महाविद्यालय मैदानावर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. तर पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील स. प. महाविद्यालय मैदानावर होणारा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून, इतरांना हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि मेट्रो यांच्या विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पुणेकरांसाठी खुला असणार आहे. दहा हजार जणांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमासाठी स.प.महाविद्यालय आणि पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मोठा मंडप टाकण्याची तयारी सुरू आहे. स.प.महाविद्यालयात आवश्यक तेथे डांबरीकरण करण्यात येत असून, मैदानाच्या हिरवळीवर मोठा मंडप घालण्याचे काम सुरू आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव तीन दिवस महाविद्यालयात चौकशी करूनच लोकांना सोडण्यात येणार आहे. प्रोटोकॉल अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन कार्यक्रम सुरळीत आणि चांगला पार पडावा यासाठी अधिकार्‍यांना जबाबदारीचे वाटप केले आहे. त्यानुसार अधिकारी कामाला लागले आहेत.

 हेही वाचा : 

Red alert in Mumbai : मुंबईला पावसाचा पुन्हा रेड अलर्ट

महाराष्ट्रातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘युवा पर्यटन मंडळ’; राज्य शासनाचा निर्णय | Youth Tourism Board

Back to top button