पोलिस मेगासिटी गृहप्रकल्पाचे फॉरेन्सिक ऑडिट होणार | पुढारी

पोलिस मेगासिटी गृहप्रकल्पाचे फॉरेन्सिक ऑडिट होणार

पुणे/ येरवडा : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील लोहगाव येथील पोलिस कर्मचार्‍यांसाठी बांधण्यात येत असलेल्या महाराष्ट्र पोलिस मेगासिटी गृहनिर्माण प्रकल्पातील आर्थिक अपहार तपासण्यासाठी पोलिसांसाठी फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी महाराष्ट्र पोलिस मेगासिटी गृहनिर्माण प्रकल्पात होत असलेला विलंब आणि आर्थिक अपहार, याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करावी आणि हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी म्हाडाला हस्तांतरित करण्याबरोबरच इतर उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार टिंगरे यांनी केली होती.

त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पोलिसांसाठी महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प 2008 पासून रखडला आहे, ही वस्तुस्थिती आहे. प्रकल्प राबविणार्‍या कंपनीची आर्थिक परिस्थिती काय आहे, हे आता तपासण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात पुणे पोलिस आयुक्तांनी बैठकही घेतली आहे. त्यानुसार प्रकल्पात झालेली अनियमितता तपासण्यासाठी गृहनिर्माण संस्थेच्या उपनिबंधकांमार्फत लेखापरीक्षण करण्यात येईल तसेच या प्रकल्पातील पैशांचा गैरव्यवहार झाला आहे का? तसेच ते इतर कुठे वळविण्यात आले आहेत? हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटही करण्यात येईल. त्यात दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

पोलिसांना घरे मिळालीच पाहिजेत, यासाठी शासनस्तरावर येत्या महिनाभरात मी सर्व संबंधितांची बैठकही बोलावतो. सर्व कायदेशीर विकल्प तपासून कार्यवाही केली जाईल.
                                                        – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Back to top button