मावळात भातपीक लागवडी वेगाने सुरु | पुढारी

मावळात भातपीक लागवडी वेगाने सुरु

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा :  पावसाने मावळ तालुक्यात दमदार सुरुवात करताच खरीप भातपिकाच्या लागवडीस वेग घेतला आहे. तालुक्यातील खरीप भातपीक उत्पादक शेतकरी इंद्रायणी भात लागवडीस सर्वाधिक पसंती देतात. यावर्षी होणार्‍या एकूण लागवडीपैकी सुमारे 90 टक्के भात लागवडी या इंद्रायणी वाणाच्याच होतील, असा अंदाज कृषी अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
मावळ तालुक्यात खरीप भातपिकाचे लागवडीखालील क्षेत्र हे सुमारे 13 हजार 500 हेक्टर आहे. मावळ तालुक्यात खरीप भातपीक म्हणून इंद्रायणी, फुले, समृदी, कोळंब, आंबेमोहोर, साळ इत्यादी विविध वाणाचे पीक शेतकरी घेत असतात.

यावर्षी इंद्रायणी भातपीक घेण्याचा शेतकरीबांधवाचा कल दिसत आहे. मावळ तालुक्यात कृषी खात्याने यावर्षी 13 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्याचे नियोजन केलेले आहे. मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचारी शेतकरीबांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी परिश्रम करताना दिसून येत आहेत. गेल्या दहा-बारा दिवसांपासून मावळ तालुक्यात मान्सूनच्या पावसाने चांगली सुरुवात केलेली आहे. ज्या शेतकर्‍यांनी नदीच्या अथवा विहिरीच्या पाण्यावर भात रोपे तयार केली, त्यांच्या भातलागवडी वेगाने सुरू आहेत.

Back to top button