व्यावसायिक अभ्यासक्रमांना ‘अच्छे दिन’; गतवर्षीच्या तुलनेत अधिक अर्ज | पुढारी

व्यावसायिक अभ्यासक्रमांना ‘अच्छे दिन’; गतवर्षीच्या तुलनेत अधिक अर्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या शैक्षणिक संकुलातील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून नकाराची घंटा मिळत असून, गेल्या दोन वर्षांपासून प्रवेश अर्जांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. यंदा 78 पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या (मास्टर्स डिग्री) प्रवेशासाठी 14 हजार 442 अर्ज आले आहेत. गेल्या वर्षी हीच संख्या 18 हजार 270 होती. यंदा तब्बल 25 पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशक्षमतेच्या तुलनेत कमी अर्ज आल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठातील पदविका, पदवी, पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यंदा पदवी आणि एकात्मिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा झाली असून, त्यातील गुणांच्या आधारे प्रवेश परीक्षा राबविण्यात येणार आहे. विद्यापीठातील 78 मास्टर्स डिग्री अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता 2 हजार 795 आहे. त्यातील 25 पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठीचा प्रतिसाद कमालीचा घटला असून, त्यासाठी 334 विद्यार्थ्यांनी अर्ज केला.

त्यामध्ये एमटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी, एमटेक इन मॉडेलिंग अँड सिम्युलेशन, एमटेक इन मॅकेनिकल अँड मटेरिअल्स टेक्नॉलॉजी, एमटेक इन इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, एमटेक इन सायंटिफिक इंस्ट्रुमेन्टेशन अँड मेडिकल डिव्हायसेस, एमटेक इन एनर्जी टेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एमए इन डान्स, एमए इन ड्रामा, एमए इन म्युजिक, एमए इन योगा, एम इन बुद्धिस्ट स्टडिज, एक्झिक्युटिव्ह एमबीए, एमएस्सी अर्बन वॉटर अँड सॅनिटायझेशन अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या सर्व अभ्यासक्रमांना कमी अर्ज आल्यामुळे त्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, परीक्षेचे निकाल जाहीर व्हायचे आहेत. त्यामुळे यापुढे अर्जांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येणार आहे.

एमएस्सी इन केमिस्ट्रीसाठी सर्वाधिक अर्ज

पुणे विद्यापीठातून एमएस्सी इन केमिस्ट्री करण्यासाठी सर्वाधिक 2 हजार 63 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्याखालोखाल एमएस्सी इन मायक्रोबायलॉजीला प्रवेशासाठी 1 हजार 153, तर एमएस्सी इन कॉम्प्युटर सायन्सला प्रवेशासाठी 1 हजार 39 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्याचप्रमाणे एमएस्सी इन स्टॅटिस्टिक्स, फिजिक्स, एमए इन सायकॉलॉजी, पॉलिटिक्स, इकॉनॉनिक्सलाही पसंती दिली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा 22 ते 24 जुलैदरम्यान होणार असल्याचे संकेतस्थळावर म्हटले आहे.

हेही वाचा

सिंधुदुर्गातील रिक्त शिक्षक पदांवर निवृत्त शिक्षकांची भरती

शिवाजीनगर पोलिस ठाण्यास सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान

छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; पुणे पोलिसांकडून एकास अटक

Back to top button