रेकी करून सराफांना लुटणार्‍या दोघांना बेड्या - पुढारी

रेकी करून सराफांना लुटणार्‍या दोघांना बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सुवर्णकारांचा पाठलाग करून त्यांची रेकी केल्यानंतर सोन्याचा ऐवज लुटणार्‍या टोळीतील दोघांना राजगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खासगी ट्रॅव्हलमधून 81 लाखांचे दागिने आणि 18 लाखांची रोकड चोरणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळताना पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 37 लाख 72 हजार रुपयांचे एक किलो सोन्याचे वेगवेगळ्याप्रकारचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

मारुती राजाराम पिटेकर (रा. माळंगी, कर्जत, नगर), अनंता लक्ष्मण धांडे (वय 40, रा. वालवड, कर्जत, नगर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी कमलेश सुकनराज राठोड यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, राजगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पोर, मनोजकुार नवसरे, अंमलदार खरात, तोडकर, घुले, माने, मदने, जाधव, राजीवडे, लोणकर, मारणे, भोर तसेच कर्जत पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि यांच्या पथकाने ही कारवाई केली.

म्हणून बिबट्याने अन्नाविना घालवला पाण्यावरच दिवस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमलेश सुकनराज राठोड हे हुबळी ते मुंबई असा खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करीत होते. त्यांच्या सोबतच्या सीटवर दोघे आरोपी त्यांच्या आणखी एका साथीदारासमवेत सहप्रवासी म्हणून होते. प्रवासादरम्यान त्यांचे 18 लाख रुपये व 81 लाख 24 हजार रुपये किमतीचे 2 किलो 110 ग्रॅम वजनाचे 18 कॅरेटचे सोन्याचे वेगवेगळे दागिने असलेली खाकी रंगाची सॅक चोरीला गेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे आणि पोलिस नाईक मदने यांनी हुबळी येथे जाऊन तपास केला. तिकीट बुकिंग, सीसीटीव्ही चित्रीकरण व अन्य तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या पथकाने 6 दिवस कर्नाटकमध्ये आरोपींचा शोध घेतला.

अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीचा छापा

या शोधमोहिमेत कर्जत (अहमदनगर) आणि कुर्डूवाडी (सोलापूर) या ठिकाणी हे चोरटे असल्याचे समजताच पथके पाठवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून 38 लाख रुपये किमतीचे एक किलो सोने जप्त केले. आरोपींचा ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय असून, ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते होलसेल सोन्याचे दागिने विकण्याचा व्यवसाय करणार्‍यांना हेरत असत. संबंधित व्यापारी ज्या लॉजमध्ये राहत असे, त्याच्या शेजारील रूम बुक करीत असत. संधी मिळाली तर रूममधून बॅग पळवत, अन्यथा तो प्रवास करीत असताना प्रवासात संधी साधत असत. मारुती पिटेकर आणि अनंता धांडे या दोघांवर कराड, म्हैसूर रेल्वे, नंदुरबार पोलिस ठाण्यांत चोरी, दरोडा, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत.

परमबीर सिंग विरुद्ध मुंबई गुन्हे शाखा न्यायालयात

गुन्ह्यातील रेकीनंतर साधायचे डाव

आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. चोरी करण्यापूर्वी ते सराफी दुकाने, व्यावसायिक व त्यांच्याकडे दागिने व पैशांची ने-आण करणार्‍या व्यक्तींवर काही दिवस बारकाईने लक्ष ठेवीत असे. त्यानंतर प्रवासामध्येही त्यांच्या आजूबाजूला राहत. रात्रीच्या वेळी संबंधित व्यक्ती झोपल्यानंतर त्यांच्याकडील दागिने, पैशांची बॅग चोरायचे.

‘‘प्रवाशांची लूट होत असल्याचे गुन्हे घडत असताना नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. आपण ज्या एसटी, ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहोत, त्या बसमधील व्यक्ती रस्त्यामध्ये काही कारण सांगून उतरत तर नाही ना, त्यांच्या हातात बॅग तर नाही ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिक, ट्रॅव्हल्सचे चालक, वाहक यांनी देखील सतर्क राहिले पाहिजे.’’
– डॉ. अभिनव देशमुख,
पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

Back to top button