

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड येथील महापालिकेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उभारण्यात आलेली रक्तघटक रक्तपेढीचे पुढील आठवड्यात लोकार्पण होत आहे. या रक्तपेढीत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसार रक्त व रक्त घटक उपलब्ध करून दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे महापालिकेच्या रुग्णालयात तसेच सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय महाविद्यालय संलग्न शासकीय रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना रक्त व रक्तघटक मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिकरोड येथील महापालिकेच्या जेडीसी बिटको (जुने) रुग्णालयात डिसेंबर १९९१ पासून रक्तपेढी कार्यरत आहे.
या रक्तपेढीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्तपुरवठा केला जातो. मात्र या रुग्णालयात रक्तविघटन युनिटची सुविधा नसल्यामुळे आंतररुग्ण व बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. नाशिकरोड विभागात महापालिकेच्या माध्यमातून नूतन बिटको रुग्णालय अर्थात स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.
या नूतन रुग्णालयाच्या इमारतीत ३ हजार चौरस फूट जागा रक्तविघटन रक्तपेढीसाठी आरक्षित करण्यात आली आहे. महापालिकेने चलार्थ पत्र मुद्रणालयाला पत्र पाठवत या रक्तविघटन रक्तपेढीसाठी सीएसआर निधीतून ३.६६ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. चलार्थ पत्र मुद्रणालयाने सीएसआरअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला.
यातून रक्तघटक रक्तपेढीकरिता उपकरणांसह आवश्यक सामग्री खरेदीसाठी ३.१७ कोटी रुपये तर स्थापत्यविषयक कामे, फर्निचर, एसी, विद्युतविषयक कामांसाठी सुमारे ४५ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. या रक्तघटक रक्तपेढीला केंद्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची मान्यतादेखील मिळाली आहे. आता पुढील आठवड्यात या रक्तपेढीचे लोकार्पण होत आहे.
खासगीकरणाचा प्रस्ताव रद्द
सदर रक्तपेढीचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्यास विरोध झाल्याने महापालिकेने स्वतः ही रक्तपेढी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रक्तपेढीसाठी मानधनावर ८ रक्तपेढी तंत्रज्ञ, ६ परिचर प्रयोगशाळा आदी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील नवजात शिशु कक्षही सुरू होणार
महापालिकेच्या माध्यमातून जुने नाशिक परिसरातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात नवजात शिशु कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांअभावी हा कक्ष बंद होता. आता मात्र या कक्षासाठी दोन बालरोग तज्ज्ञ, २ हेड नर्स, १० नर्स, ७ वॉर्डबॉयची नियुक्ती करण्यात आली असून, पुढील महिन्यात हा कक्षही सुरू केला जाणार आहे.