who is Ashok Kharat: नाशिकचा भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरात कोण आहे, महिलेने त्याच्यावर काय आरोप केले?

Nashik Todays Crime News: लैंगिक शोषण प्रकरणी नाशिक क्राईम ब्रांच कडून अटक
Ashok Kharat Nashik
Ashok Kharat NashikPudhari
Published on
Updated on

Who is Ashok Kharat Nashik Crime Case

नाशिक : शहरातील बहुचर्चित ‘स्वघोषित कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांत्रिक अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने अटक केली आहे. हा अशोक खरात कोण आहे, त्याच्यावरील आरोप काय, त्याच्याकडून पोलिसांनी काय काय जप्त केले हे जाणून घेऊया...

अशोक खरातवर महिलेने काय आरोप केले आहेत?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीत आरोपीने स्वतःला अध्यात्मिक मार्गदर्शक आणि मांत्रिक म्हणून ओळख निर्माण केली होती. विविध अडचणी दूर करण्याचे तसेच जीवनातील समस्या सोडविण्याचे आश्वासन देत त्याने अनेक महिलांशी संपर्क साधला होता. फिर्यादी महिलेलाही त्याने अशाच प्रकारे विश्वासात घेतल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने महिलेला धमकी देत तसेच गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर नाशिक क्राइम ब्रांच युनिट-१ च्या पथकाने बुधवारी (दि.१८) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अशोक खरात याला ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर त्याच्या ठिकाणी छापा टाकून तपास करताना पेनड्राइव्हसह काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले.

एक पेनड्राईव्ह... 58 आक्षेपार्ह व्हिडिओ

सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना आरोपीकडून एक पेनड्राइव्ह जप्त केला असून त्यामध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी, वरिष्ठ अधिकारी तसेच राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व व्हिडिओंची पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू असून या प्रकरणातून आणखी गंभीर बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अशोक खरात कोण आहे?

अशोक खरात हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असल्याची माहिती आहे. तो अंकशास्त्रज्ञ व अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करत होता. विविध क्षेत्रातील अनेक व्यक्ती त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असल्याचे सांगितले जाते.

अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील सेवानिवृत्त अधिकारी असल्याचीही माहिती पुढे आली आहे. मर्चंट नेव्हीमध्ये त्याने सुमारे २२ वर्षे सेवा बजावली असून त्या काळात १५४ देशांचा प्रवास केल्याचा दावा त्याने केला होता. विविध देशांतील धार्मिक परंपरा, संस्कृती आणि आध्यात्मिक पद्धतींचा अभ्यास केल्याचे तो सांगत असे. त्यानंतर त्याने अंकशास्त्र, कॉस्मॉलॉजी आणि अध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली कार्य सुरू केले होते.

दरम्यान, या घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची तपासणी करून संबंधित सर्व बाबींचा छडा लावावा, तसेच जर इतर महिलांची फसवणूक अथवा अत्याचार झाल्याचे आढळून आले तर त्यांनाही न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अशोक खरातविरोधात आणखी गुन्हे दाखल होणार?

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक क्राइम ब्रांच युनिट-१ कडून सुरू असून जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात आणखी गुन्हे नोंद होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news