कार्ला : मावळातील पर्यटनस्थळी वाहतूक कोंडी | पुढारी

कार्ला : मावळातील पर्यटनस्थळी वाहतूक कोंडी

कार्ला : मावळ तालुक्यात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू झाली असल्यामुळे हजारोंच्या संख्येने पर्यटकही दाखल झाले आहेत. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.

वाहनांच्या लांब रांगा
मावळातील सर्व पर्यटनस्थळी शनिवारी हजारो पर्यटकांनी भेट देत वर्षाविहाराचा आनंद लुटला. कार्ला परिसरातील लोहगड, विसापूर किल्ले तसेच भाजे येथे असणार्‍या धबधब्यांखाली भिजताना पर्यटक दिसत होते. कार्ला आई एकवीरादेवी रोड तसेच कार्ला-मळवली रोडवर तसेच मळवली-भाजे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच मळवली रेल्वे गेटवर देखील पर्यटकांना तासंनतास रांगेत थांबावे लागले. त्यामुळे पर्यटकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.

वाहनांची संख्या प्रचंड असल्यामुळे वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली होती. शनिवारी, रविवारी मळवली स्टेशन तसेच कार्ला फाटा, वेहरगाव आई एकवीरादेवी पायथ्या येथे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त फौज तैनात ठेवण्यात यावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.

कार्ला फाट्यावर वाहतूक पोलिस नियुक्त करा
पावसाळ्यात शनिवार, रविवारी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कार्ला फाट्यावर येथे वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी मावळ तालुका युवासेना प्रमुख विशाल हुलावळे यांनी लोणावळा उपविभागीय पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मावळ तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून पावसाळ्यात लोणावळ्यासह कार्ला भागातील एकवीरा देवी मंदिर, कार्ला लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर किल्याकडे हजारो पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी येत असल्याने मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर तसेच कार्ला-वेहरगाव रोडवर वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे वाहतूक पोलिस तैनात करण्याची मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांना मिळाला रोजगार
पुणे-लोणावळा लोकल देखील पर्यटकांनी तुडूंब भरून येत असल्याने मळवली रेल्वे स्टेशनवर गर्दी झाल्याचे दिसून आले. पर्यटनस्थळांवर गर्दी वाढत असल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाल्याने स्थानिक नागरिक देखील आनंदित झाले होते.

Back to top button