शंभर आमदारही निवडून आणता आले नाहीत ; चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर टीका | पुढारी

शंभर आमदारही निवडून आणता आले नाहीत ; चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर टीका

बारामती : पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांना राज्यात कधीही शंभर आमदार निवडून आणता आले नाहीत. त्यांचे वय 84 वर गेले, तरीही विधानसभेत शंभरचा आकडा त्यांना गाठता आला नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भाजपने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शंभरपेक्षा अधिक आमदार निवडून आणले, असेही ते म्हणाले.
बारामती तालुक्यातील सोनगाव येथे भाजपच्या ’मोदी ऽ 9’ कार्यक्रमांतर्गत आयोजित उपक्रमात ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले की, या काँग्रेसने 65 वर्षे सत्ता चालवली. परंतु, माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की, मी जेव्हा एक रुपया पाठवतो तेव्हा 15 पैसे जनतेपर्यंत पोहचतात.

हेच 15 पैसे बारामतीत पोहचत असतील, तर उरलेले 85 पैसे कुठे जातात? असा सवाल त्यांनी केला. शरद पवार यांनी भाजप-सेनेच्या सरकारमध्ये मुस्लिम व ख्रिश्चनांची चिंता वाटत असल्याचे सांगितले होते. सरकार गेल्यानंतर त्यांना आता ही चिंता वाटू लागली आहे. परंतु, सरकारमध्ये असताना त्यांना उद्योगपतींची चिंता होती. औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर जिल्ह्यांच्या नामांतराची चूक आहे का? असा सवाल बावनकुळे यांनी केला. कर्नाटकमध्ये पंजाचे सरकार आले. तेथे यापूर्वी भाजप सरकार असताना धर्मांतरबंदी कायदा आणला होता. परंतु, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका आदेशाने तेथील सध्याच्या सरकारने हा कायदा रद्द केल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

उद्धव ठाकरेंबाबत निर्णय करावा लागेल; बावनकुळे यांचा इशारा

 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय करावा लागेल, राजकारणात विरोधी पक्षाची टीका झेलण्याची तुमच्यात क्षमता असायला हवी. आम्ही त्यांच्या कार्यक्षमतेवर टीका केली. मात्र, परिवारावर कधीही टीका केली नाही. परिवारावर टीका करायची असेल तर त्यांच्या एक हजार गोष्टी आमच्याकडे आहेत. ते देवेंद्र फडणवीसांवर अशा पद्धतीने टीका करीत असतील, तर त्यांच्याबाबतीत आम्हाला निर्णय करावा लागेल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना माझे आव्हान आहे, विधान मंडळामध्ये त्यांनी ’पीएम केअर फंडा’बाबत आवाज उठवावा. मागील अधिवेशनामध्ये ते काही बोलले नाहीत. ते एकच दिवस अधिवेशनामध्ये आले. त्यांना ठाणे, नागपूर येथील महापौरांचा भ्रष्टाचार माहिती आहे, तर अधिवेशनामध्ये येऊन ते मांडायला हवे होते. सरकार त्याची चौकशी करेल.

…हे तर अजित पवार यांचे दुर्दैव
विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या पद्धतीने काम करणारे नेते आहेत. त्यांना पक्षसंघटनेमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवावी लागणे, हे दुर्दैव आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

हे ही वाचा : 

भाजपमध्ये जाण्याची आमच्यातील कोणाची इच्छा नाही : सतेज पाटील

मान्सून अखेर बरसला ; पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात पावसाच्या सरी

Back to top button