भाजपमध्ये जाण्याची आमच्यातील कोणाची इच्छा नाही : सतेज पाटील | पुढारी

भाजपमध्ये जाण्याची आमच्यातील कोणाची इच्छा नाही : सतेज पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपमध्ये ज्यांना जायचे होते ते 2014 मध्येच गेले आहेत. आता आमच्यातील भाजपमध्ये कोणाला जायची इच्छा नाही. कोल्हापुरात भाजपच्या जुन्या नेत्यांच्या डोक्यावर नवीन लोक बसविले आहेत. आणखी किती लोक भाजपवाले बसविणार आहेत माहीत नाही. असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कोल्हापूरमधील काही नेते हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. पाटील म्हणाले, ज्यांना जायचे होते ते भाजपमध्ये गेले आहेत. आता आमच्यातले कोणीही भाजपमध्ये जाणार नाहीत. कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत आहे. यामुळे यातील बाहेर कोण जाईल असे वाटत नाही. आम्ही सामान्य कार्यकर्त्यांना डीपीडीसीमध्ये स्थान दिले होते. भाजपने मात्र प्रमुख नेत्यांना डीपीडीसीमध्ये स्थान दिले जात आहे. यावरून भाजप सामान्य कार्यकर्त्यांचा किती सन्मान करते हे दिसून येते. कोल्हापुरातील भाजप नवीन लोकांच्या ताब्यात असल्याचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना माहीत आहे. यामुळे आणखी काहींना पक्षात घेऊन भाजप जुन्या कार्यकर्त्यांना पूर्णच बाजूला करणार आहे काय?

महागाई, बेरोजगारी पासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजप सतत करत आहे. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून केंद्र सरकार दबावाच राजकारण करत आहे. याला सर्वांनी विरोध केला पाहिजे. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी देशाती सर्व प्रमुख विरोधक एकत्र येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. ही आघाडी भक्कम राहील, असेही आ. पाटील म्हणाले.

Back to top button