New Delhi : लोकसभा निवडणूकीचा चौथा टप्पा भाजपसाठी आव्हानात्मक

New Delhi : लोकसभा निवडणूकीचा चौथा टप्पा भाजपसाठी आव्हानात्मक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपला आहे. चौथ्या टप्प्यात आघाडी मिळविण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी सर्व ताकद पणाला लावली. विशेषत: हा टप्पा भाजपसाठी सर्वात कठीण असणार आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता या टप्प्यात आघाडी मिळवण्यासाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे.

भाजपला निम्म्याहून कमी जागा

गेल्या दोन लोकसभा निवडणूकांचे आकडे बघितले तर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत भाजपला निम्म्याहून कमी जागा मिळाल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात भाजपला ९६ पैकी केवळ ४२ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसची कामगिरी आणखी वाईट होती. यात काँग्रेसला केवळ ६ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत सर्वोत्तम कामगिरी जगनमोहन रेड्डी यांच्या पक्ष वायएसआर काँग्रेसची होती. या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला २२ जागा मिळाल्या होत्या. (New Delhi)

निवडणुकीच्या या टप्प्यात बीआरएस (तत्कालीन टीआरएस) तिसऱ्या क्रमांकावर होते. या टप्प्यात बीआरएसला ९ जागा मिळाल्या होत्या. या चौथ्या टप्प्यात शिवसेनेला २, तृणमूल काँग्रेसला ४, तेलगु देसम पक्षाला ३, एमआयएमला २ तर बीजद, जदयू, जेकेएन, लोजपा, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यावर नजर टाकली असता भाजपची कामगिरी आणखी सुमार होती. या टप्प्यात भाजपने ३८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. तसेच शिवसेनेला ४ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत तेलगु देसम पक्षाला १६ जागांसह आघाडी मिळाली होती. तर बीआरएस ११, वायएसआर काँग्रेस ९, तृणमूल ६, बीजद ४, पीडीपी आणि सपाला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. (New Delhi)

भाजपसमोरील सर्वात मोठे आव्हान

या आकडेवारीनुसार तर चौथ्या टप्प्यात विरोधकांना गमावण्यासारखे काही नाही. मात्र काही मिळवण्यासाठी अनेक दरवाजे उघडे आहेत. विशेषत: काँग्रेससाठी चौथा टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात चांगली कामगिरी करून काँग्रेस आपला आकडा वाढवू शकते. २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा वाचवणे, हे भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान असणार आहे. आंध्र प्रदेशात भाजप आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने आकडे वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तेलंगणात मात्र मागील निवडणुकीप्रमाणे कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे. आंध्र प्रदेशात जगनमोहन यांचा पक्ष वायएसआर काँग्रेसला या टप्प्यात सर्वाधिक नुकसान होण्याची भीती आहे. गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा वाचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. संख्या वाढण्याची अपेक्षा नाहीच्या बरोबर आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news