पुणे : खरेदीखत झाले… मग, द्या स्वखुशीने ! सबरजिस्ट्रार यांचा वसुलीचा नवा फंडा | पुढारी

पुणे : खरेदीखत झाले... मग, द्या स्वखुशीने ! सबरजिस्ट्रार यांचा वसुलीचा नवा फंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘साहेब, तुमचे खरेदीखत झालेय… बघा… मग किती द्यायचे… द्या स्वखुशीने…’ असा नवा फंडा आता शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या दस्तनोंदणी कार्यालयातील सबरजिस्ट्रार यांनी काढला आहे. बरं ही स्वखुशी म्हणजे कमीत कमी दहा हजार रुपये अशी आहे. ! शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 27 दस्तनोंदणी कार्यालये आहेत. या कार्यालयांमधील दस्तनोंदणीसाठी अनधिकृतपणे घेण्यात येणा-या रकमेबाबत दैनिक ’पुढारी’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर सर्वच सबरजिस्ट्रार अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत. ‘पुढारी’च्या दणक्याने अनेकांनी खरेदीखत झाल्यानंतर तुमच्या खुशीने द्या, असा फंडा शोधून काढला आहे.

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने तुकडेबंदी कायद्याच्या अधिनियमानुसार एक किंवा दोन गुंठ्यांचे खरेदीखत व्यवहार करता येत नाही. मात्र, सब रजिस्ट्रार यांनी या नियमाला फाटा देऊन अनेक क्लृप्त्या वापरून खरेदीखते करण्याचा सपाटा सुरूच आहे. परिणामी, आयुष्यात एकदाच घर घेणा-या नागरिकांना नाइलाजाने का होईना पण या सबरजिस्ट्रारची ‘स्वखुशीची’ पूर्तता पूर्ण करावी लागत आहे.
पुणे शहरात दीड वर्षापूर्वी दहा हजार बोगस खरेदीखतांचे प्रकरण बाहेर आल्यावर या प्रकरणातील 44 दोषींवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर काही महिने अनधिकृत खरेदीखत करण्याचे कामकाज थांबले होते.

आता मात्र गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा बेकायदेशीर खरेदीखते करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील प्रत्येक दस्तनोंदणी कार्यालयात दररोज किमान 50 खरेदीखते होतात. त्यामध्ये काही नियमानुसार असतीलही. मात्र, प्रत्येक खरेदीखताच्या मागे ‘स्वखुशी’ द्यावीच लागत आहे. ही बाब लक्षात घेतल्यास एका दस्तनोंदणी कार्यालयातील दस्तनोंदणीचा आकडा अधिक दहा हजार रुपये अशी संख्या लक्षात घेतल्यास ही रक्कम पाच लाखांच्या आसपास पोहचत आहे. म्हणजेच 27 कार्यालयांतून दररोज (बेकायदेशीररीत्या) कमीतकमी 1 कोटी 35 हजार रुपये जमा होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनधिकृत खरेदीखतांचा गोरखधंदा जोरात सुरूच आहे.

हे ही वाचा : 

सातारा : परत पाय ठेवला तर खल्लास करीन : खा. उदयनराजेंकडून धमकी

सांगली : खुल्या जागांच्या बाजाराला आयुक्तांचा चाप

Back to top button