आंतरराष्ट्रीय योग दिवस: तरुण गिरवताहेत योगसाधनेचे धडे | पुढारी

आंतरराष्ट्रीय योग दिवस: तरुण गिरवताहेत योगसाधनेचे धडे

दीपेश सुराणा : 

पिंपरी : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढत्या ताणतणावामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी योगसाधना करण्याकडे तरुणांचा कल वाढू लागला आहे. योग शिक्षकांकडे योग अध्ययन करण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये 30 वयोगटाच्या आतील तरुण-तरुणींचे प्रमाण हे अन्य वयोगटातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत जवळपास 60 टक्क्यांहून अधिक असल्याचे निरीक्षण योगशिक्षकांनी मांडले आहे. त्यातून विदेशातही नोकरी-व्यवसायाची संधी मिळत असल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे.

योगसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यामध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो.

जीवनशैलीतील बदलात योगसाधना उपयुक्त
सध्या जीवनशैलीत कमालीचा बदल झाला आहे. कामाचे बैठे स्वरुप, वाढते ताणतणाव, शारीरिक व्यायामाचा अभाव, फास्टफूड खाण्याचे वाढत चाललेले प्रमाण अशा एकदंरीत जीवनशैलीत शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत योगाचे पद्धतशीर शिक्षण घेऊन आपण आपले आरोग्य जपू शकतो.

विदेशातही योगाला प्रसिद्धी
तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. देशातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली आहे. योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. पिंपरी-चिंचवड येथील योग विद्याधाम या संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्‍या प्रशिक्षण वर्गात योगसाधनेचे धडे गिरवून 8 ते 10 जणांना विदेशात नोकरी-व्यवसायाच्या संधी मिळाल्या आहेत. येथील विद्यार्थी हंगेरी, जपान, चीन, सिंगापूर आदी देशांमध्ये योग साधनेचे प्रशिक्षण वर्ग घेऊन हे विद्यार्थी चांगले उत्पन्न कमावत आहेत. योग विद्याधाम येथून योगसाधना शिकून बाहेर पडलेल्या बबिता वाघ या 30 वर्षीय विवाहीत महिला हंगेरीमध्ये दरमहा 1.25 लाख रुपये इतके वेतन घेत आहेत, अशी माहिती योग विद्याधामचे केंद्रप्रमुख प्रमोद निफाडकर यांनी दैनिक ‘पुढारी’ला दिली.

योग विद्याधामच्या प्रशिक्षण वर्गात एका वेळी जर 15 विद्यार्थी शिक्षण घेत असतील, तर त्यातील किमान 10 विद्यार्थी हे 20 ते 30 वयोगटातील आढळतात. त्याचप्रमाणे, वर्षभरात 150 विद्यार्थी शिक्षण घेऊन योगशिक्षक होतात. त्यातील जवळपास 100 विद्यार्थी हे 20 ते 30 वयोगटातील असतात. याचा अर्थ तरुणांमध्ये योग शिक्षणाविषयी कल वाढू लागला आहे.
       – प्रमोद निफाडकर, केंद्रप्रमुख, योग विद्याधाम, पिंपरी-चिंचवड

Back to top button