औधमधील प्रस्तावित रुग्णालयात मोफत उपचार | पुढारी

औधमधील प्रस्तावित रुग्णालयात मोफत उपचार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : औंध रुग्णालयातील खासगीकरणाचा वाद सध्या गाजत आहे. प्रस्तावित 2000 बेडचे रुग्णालय पीपीपी तत्त्वावर विकसित करून तेथे नागरिकांना पूर्णपणे मोफत उपचार मिळतील, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंगळवारी जाहीर केले. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील उपचार पुढील महिनााभरात मोफत मिळतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे देवदूतांचा सन्मान आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता.

दैनिक ‘पुढारी’चे निवासी संपादक सुनील माळी व अन्य काही ज्येष्ठ पत्रकारांनी सावंत यांची मुलाखत घेतली. या प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एस. के. जैन, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, राज्य संघटक संजय भोकरे आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, ‘औंध रुग्णालयाजवळील 75 एकर जागा पीपीपी तत्त्वावर विकसित केली जाणार आहे. या जागेवर ‘मेडिकल सिटी’ उभारण्याचा मानस असून, वैद्यकीय महाविद्यालय, 1500 बेडचे जनरल हॉस्पिटल, 300 बेडचे मानसिक रुग्णालय, 300 बेडचे कर्करोग रुग्णालय, संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. रुग्णांच्या नातेवाइकांसाठी 2000 व्यक्तींची व्यवस्था होऊ शकेल असा निवास कक्षही उपलब्ध असेल. शासनाच्या चौकटीत राहून सर्व काम केले जाणार असून, सर्व सेवा 100 टक्के मोफत पुरविल्या जातील.’

पुरुषांसाठी आरोग्य अभियान
पुढील एका वर्षात राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे हेल्थ कार्ड तयार केले जाणार असून, त्यावर वैद्यकीय पार्श्वभूमी, उपचार यांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यामुळे उपचार घेणे सोपे होणार आहे. ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’, ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ या अभियानांनंतर आता पुरुषांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात होणार आहे.

औषध खरेदीसाठी प्राधिकरण
तामिळनाडू पॅटर्नच्या धर्तीवर महाराष्ट्रात औषध खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करण्यात येत आहे. औषध खरेदीमध्ये भ—ष्टाचार होऊ नये, यासाठी ई-टेंडरिंग, ई-गोडाऊन, ई-ट्रान्सपोर्ट, ई-पेमेंट अशी ऑनलाइन सिस्टिम राबवली जाणार आहे. यातून शासनाचे 1000-1200 कोटी रुपये वाचू शकतील.

महत्त्वाच्या घोषणा
आरोग्य खात्यासाठी वाढीव तरतुदीची मागणी
मेळघाटमधील गर्भवतींसाठी कार्यक्रम
2 लाख वारकर्‍यांची वर्षातून दोनदा तपासणी आणि औषधोपचार
धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्यदूत
धर्मादाय रुग्णालयांमधील खाटांची उपलब्धता ऑनलाइन कळणार

हे ही वाचा :

पुणे : डॉ. रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळला

विधी, बी. एड्. प्रवेशसाठी 22 पर्यंत नोंदणीची संधी

Back to top button