पुणे आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद? | पुढारी

पुणे आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद?

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सर्वाधिक श्रोते असलेल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याच्या हालचाली प्रसारभारतीकडून सुरू झाल्या आहेत. अधिकारी नसल्याच्या कारणावरून पुणे केंद्रावरून सकाळी प्रसारित होणार्‍या प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातम्या 19 जूनपासून छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार आहेत. या विभागाद्वारे प्रसारित केली जाणारी विविध भारतीवरील ठळक बातमीपत्रे, पुणे वृत्तांत हे विशेष बातमीपत्र आणि वृत्ताधारित कार्यक्रम आता बंद होणार आहेत. या निर्णयामागे कारण देताना प्रसार भारतीने या विभागांचे प्रमुख म्हणून काम करण्यासाठी भारतीय माहिती सेवेतील पूर्णवेळ अधिकारी दीर्घकाळापासून उपलब्ध नसल्याने पुणे वृत्त विभागाची बातमीपत्रे औरंगाबादला सोपवण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी भरती केली जाते. त्यामधूनच आयआयएस अर्थात भारतीय माहिती प्रसारण अधिकारी यांची निवड होते. याच प्रक्रियेतून आकाशवाणीसाठी आयआयएस अधिका-याची नेमणूक करणे शक्य आहे. मात्र, तसा निर्णय न घेता थेट केंद्रच बंद करण्याचा घाट घालून शासनाला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोना काळात तसेच आकाशवाणी मुंबईवरील हंगामी कर्मचार्‍यांच्या आंदोलन काळात पुणे वृत्त विभागाने सर्व बातमीपत्रे उत्तमरीत्या प्रसारित केली. याबद्दल आकाशवाणी वृत्तसेवा विभागाने पुणे विभागाचा गौरव केला होता. अशा वेळी मनुष्यबळाची अडचण पुढे करत शासनातर्फे विसंगत निर्णय घेतला जात असून, याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या निर्णयामुळे अर्हताधारक आणि पात्र हंगामी वृत्तनिवेदक व भाषांतरकारांच्या रोजगारावर गदा येणार आहे.

40-50 जणांच्या रोजगारावर गदा
अधिकारी नसल्याचे कारण प्रसारभारतीतर्फे पुढे करण्यात आले आहे. अधिकार्‍याची नेमणूक करणे सहजशक्य आहे. मात्र, सध्या अतिरिक्त भार असलेल्या अधिका-याची बदली करून वृत्त विभाग बंद करणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. डेस्क आणि ब्युरो बंद झाल्यावर रिपोर्टर, न्यूज रीडर अशा 40-50 जणांच्या रोजगारावर गदा येणार आहे, अशी खंत पुणे केंद्रातील एका कर्मचा-याने नाव न छापण्याच्या अटीवर दै. ’पुढारी’कडे बोलून दाखवली.

श्रोत्यांची गैरसोय होणार
आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने पुणे विभागाची बातमीपत्रे महत्त्वाची ठरणार आहेत. परंतु, तो बंद झाल्यास श्रोत्यांची गैरसोय होणार आहे. पुण्यामध्ये दर दिवसाआड केंद्रीय मंत्र्यांचे दौरे होत असतात. जी-20
परिषदेसारखे महत्त्वाचे कार्यक्रम सातत्याने होत असतात. त्यांचे वार्तांकन करून ते अन्य वृत्त विभागांना तसेच दिल्लीला पाठवण्याचे महत्त्वाचे काम पुणे वृत्त विभागाद्वारे केले जाते. या निर्णयानंतर पुण्याच्या महत्त्वाच्या बातम्या कशा पद्धतीने प्रसारित होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे ही वाचा : 

गव्हाच्या साठ्यावर केंद्राचे निर्बंध!

कोल्हापूर : कोरोना काळातील हजारो पीपीई कीटस् धूळ खात

Back to top button