शिरूर : शाळा क्रमांक एकच्या इमारतीसाठी सव्वातीन कोटी | पुढारी

शिरूर : शाळा क्रमांक एकच्या इमारतीसाठी सव्वातीन कोटी

शिरूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक 1 ची जुनी इमारत पाडून तेथे भव्य इमारत बांधली जाणार आहे. शाळेसाठी नवी इमारत उभी राहणार आहे. लाटे आळी येथील शाळेची इमारत जीर्ण झाल्याने तिचे नूतनीकरण करण्यासाठी पालिकेचे माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या प्रयत्नांतून व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष पाठपुराव्याने सुमारे सव्वातीन कोटी रुपयांचा निधी नगर विकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मंजूर केले आहेत. शिवसेना शहरप्रमुख मयूर थोरात यांनी ही माहिती दिली.

शाळा क्र.1 ही 1888 पासून सुरू आहे. या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी शिरूर नगरपरिषदेने राज्य शासनाकडे निधीसाठी मागणी केली होती. माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या प्रयत्नातून शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात व माजी नगरसेविका अंजली थोरात यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे नगर विकास खात्यांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यास यश आले.

2 मे रोजी इमारत बांधकाम व अनुषंगिक कामे करणे यासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले. तर 7 जून रोजी उर्वरित कामांसाठी 1 कोटी 75 लाख मंजूर झाले. एकूण सव्वातीन कोटी रुपये निधी शाळा इमारतीसाठी मंजूर झाला आहे. लवकरच या संदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल.

दरम्यान, शाळा नूतनीकरण व अद्ययावत शाळा बांधकाम होणार असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगले शिक्षण मिळण्यास मोठी मदत होणार आहे. शिरूर शहरातील विविध विकासकामंसाठी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या प्रयत्नाने मोठा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांचे भूमिपूजन नुकतेच झाले.

Back to top button