पालखी सोहळ्यासाठी देहूत वाहतुकीत बदल | पुढारी

पालखी सोहळ्यासाठी देहूत वाहतुकीत बदल

देहूगाव : संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त देहूगावामध्ये पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. तसेच, गुरुवारी मध्यरात्रीपासून रविवारी मध्यरात्रीपर्यंत नाकाबंदी करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

अंतर्गत रस्ते बंद
देहूगाव महाप्रवेशद्वार आणि चौदा टाळकरी प्रवेशद्वार या ठिकाणी प्रवेश बंदी असणार आहे. कोणतीही वाहने या प्रवेशद्वारापासून आत सोडली जाणार नाहीत.

असा असेल वाहतूक पोलिस विभागाचा बंदोबस्त
ज्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, त्या ठिकाणी पोलिस निरीक्षक दर्जाचे पोलिस अधिकारी असणार आहेत. वाहतूक विभागाचे एकूण 204 कर्मचारी त्यात 11 अधिकारी आणि 15 सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक असा वाहतूक पोलिस विभागाचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रस्थान सोहळ्यानिमित्त देहूगावमध्ये पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत देहूरोड पोलिस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये 15 पोलिस निरीक्षक, 60 सहायक पोलिस निरीक्षक असे पोलिस अधिकारी, 150 महिला पोलिस अंमलदार 150, 275 पुरुष अंमलदार, 200 होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दल 2 प्लॉटून, जलद प्रतिसाद दल, बॉम्बशोध व नियंत्रण पथक असा पोलिस बंदोबस्त असणार आहे.

या ठिकाणी असेल नाकाबंदी
परंडवाल चौक, खंडेलवाल चौक, भैरवनाथ चौक, साईराज चौक आणि तळवडे आयटी पार्क चौक या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून, अवजड वाहनांसह अन्य वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करून होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन निगडी वाहतूक पोलिस विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी केले आहे.

Back to top button