Loksabha election | शिरूर मतदारसंघात मताधिक्याबाबत आडाखे बांधणे सुरू..

file photo
file photo

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 13) मतदान पार पाडणार असल्याने उमेदवारांबरोबरच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये धाकधूक सुरू झाली आहे. महायुती व महाआघाडी या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना आपल्यालाच जास्त मतदान कसे होईल, याबाबतचे आडाखे बांधले जात आहेत. रविवारी जाहीर प्रचार करण्यास बंदी असल्यामुळे कार्यकर्ते पाहुण्यांच्या घरी जाऊन 'आपल्या उमेदवाराला मतदान करा बरं का' अशी विनवणी करताना पाहायला मिळाले. रविवारच्या रात्री अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी धाब्यांवर गर्दी पाहायला मिळत होती. तसेच आमचाच उमेदवार विजयी होणार याबाबतच्या पैजादेखील लावल्या जात आहेत. अनेक कार्यकर्ते आमचाच नेता विजयी होणार यावर जेवणाच्या पार्टीच्या पैजा लावताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्या विचाराचे मतदार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी गाड्यांचे नियोजन केले असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळी मतदारांना खुश करण्यासाठी काही आर्थिक देवाण-घेवाण होऊ नये यासाठी रविवारी रात्री फिरते पथक तैनात ठेवण्यात आले होते अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. शेलार म्हणाले, मतदान केंद्रामध्ये कोणालाही मोबाईल नेण्याची मुभा नाही. एखाद्या मतदाराकडे मोबाईल आढळल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून असल्याने कोणत्याही मतदाराने मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेऊ नये; सूचनेचे पालन न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही शेलार यांनी सांगितले.

उमेदवार, कार्यकर्त्यांसाठी रात्र ठरली काळजीची

एकंदरीत काय तर रविवारची रात्र उमेदवारांसाठी काळजीची ठरली असून आपापले कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून आपल्या गावात रात्रीच्या वेळेला विरोधी उमेदवाराचा एखादा कार्यकर्ता अथवा गाडी 'काही' वाटप करायला तर येणार नाही ना? याबाबतची काळजी घेताना दिसत होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news