पुणे : डाळींब, चिकू, पेरू, कलिंगड, खरबूज महागले; आंब्याची आवक घटल्याचा परिणाम | पुढारी

पुणे : डाळींब, चिकू, पेरू, कलिंगड, खरबूज महागले; आंब्याची आवक घटल्याचा परिणाम

पुणे : राज्यासह परराज्यातून आंब्याची आवक घटल्याने बाजारात डाळींब, चिकू, पेरू आदी फळांच्या खरेदीकडे नागरीकांचा कल वाढला आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने या फळांच्या भावात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, उन्हाचा चटका वाढल्याने कलिंगड व खरबुजाच्या भावात किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढ झाली असून मागणीअभावी पपईचे भाव उतरले आहेत.

बाजारात लिंबांना रसवंतीगृहे, सरबत विक्रेते यांकडून चांगली मागणी आहे. बाजारात दाखल होत असलेल्या लिंबांच्या तुलनेत मागणी वाढल्याने 15 किलोंच्या गोणीमागे भाव शंभर रुपयांनी वधारले आहेत. किरकोळ बाजारात दहा रुपयांना तीन याप्रमाणे लिंबांची विक्री सुरू आहे. उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असून दर टिकून आहेत.

रविवारी (दि. 4) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 7 ट्रक, मोसंबी 25 ते 30 टन, डाळिंब 25 ते 30 टन, पपई 20 ते 22 टेम्पो, लिंबांची सुमारे एक ते बाराशे हजार गोणी, कलिंगड 20 ते 25 टेम्पो, खरबूज 10 ते 15 टेम्पो, पेरू 300 ते 400 क्रेट्स, चिकू एक हजार डाग, गावरान आंबा 5 ते 6 टन, कर्नाटक आंब्याची दोन हजार पेटी व बॉक्सची आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 500-600, मोसंबी : (3 डझन) : 260-400, (4 डझन) : 150-250, संत्रा : (10किलो) : 400-1500, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-200, गणेश : 5-25, आरक्ता 10-60, कलिंगड : 5-20, खरबूज : 10-30, पपई : 3-15, अननस (एक डझन) : 100-500, पेरू (वीस किलो) : 250-400, चिकू (दहा किलो) : 100-500, आंबा : रत्नागिरी हापूस : तयार 4 ते 8 डझन : 1500-3000. कर्नाटक : कच्चा हापूस (1 डझन) 400-500 (1 किलो) 60-80, पायरी (1 डझन) 250-300 (1 किलो) 40-60, लालबाग (1 किलो) 25-40, बदाम/बैगनपल्ली (1 किलो) 30-40.

Back to top button