पुणे : जेजुरी विश्वस्त पदाचा वाद चिघळला; चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच, मेंढ्यासह सुंबरान मांडून देवाला साकडे | पुढारी

पुणे : जेजुरी विश्वस्त पदाचा वाद चिघळला; चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच, मेंढ्यासह सुंबरान मांडून देवाला साकडे

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान ट्रस्ट वर बाहेरील विश्वस्त नेमल्याने जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने चौथ्या दिवशी धरणे आंदोलनात खोमणे प्रतिष्ठान व ग्रामस्थ सहभागी झाले. या आंदोलनात मेंढ्या आणून पारंपरिक सुंबरान घालून देवाला साकडे घालण्यात आले. या धरणे आंदोलनाला माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी भेट दिली. भाविकांच्या सेवेसाठी स्थानिक विश्वस्त मंडळ नियुक्त करणे आवश्यक होते, आपला या आंदोलनाला पाठिंबा असून हा प्रश्न आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

जेजुरी देवसंस्थान विश्वस्त मंडळात ग्रामस्थांना 7 पैकी 6 विश्वस्त बाहेरील नेमल्याणे ग्रामस्थांच्या संतापाचे वातावरण असून या निर्णयाविरोधात ग्रामस्थांच्या वतीने जेजुरी देवसंस्थानच्या भक्त निवासासमोर सलग चौथ्या दिवशी धरणे आंदोलन सुरू आहे. दिनांक 29 रोजी जेजुरी येथील खोमणे प्रतिष्ठानच्या वतीने या आंदोलनात सहभाग घेण्यात आला. या आंदोलनात मेंढ्या आणून पारंपरिक सुंबरान मांडण्यात येवून बाहेरील विश्वस्त मंडळ रद्द व्हावे यासाठी देवाला साकडे घालण्यात आले.

या धरणे आंदोलनाला माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी भेट देवून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अनेक शतकांपासून जेजुरीच्या श्री खंडोबा देवाची सेवा , तसेच देवाची महती, रूढी परंपरा ,यात्रा जत्रा, उत्सव या जेजुरी कराणी जपल्या आहेत.या परंपरा पुढील काळात जतन करण्यासाठी जेजुरीतीलच स्थानिक विश्वस्त नेमायला हवेत. मात्र पुणे धर्मादाय उपायुक्तांनी विश्वस्त निवडी बाबत घेतलेल्या निर्णयामुळे माझ्या सहित जेजुरी करांचा प्रचंड रोष आहे. आणि हा रोष सविनय सत्याग्रहाच्या माध्यमातून व्यक्त होतोय. याबाबत स्थानिक आंदोलकांना पक्षविरहित कार्यकर्त्याच्या समवेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर लवकरच बैठक लावून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नंतर सुमारे 300 वर्षांनी जेजुरी विकास आराखडा राबविला जात आहे ,यासाठी आपण आग्रही आहोत. सुमारे 359 कोटी रुपयांचा विकास आराखडा राबवित असताना येथील स्थानिक माहिती असणारे व्यक्ती महत्वपूर्ण ठरणार आहेत. हा आराखडा यशस्वी पणे राबविण्यासाठी स्थानिक विश्वस्त हवेत असे ही विजय शिवतारे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप यादव,सेनेचे अविनाश बडदे,दादा थोपटे,धीरज जगताप,हरिभाऊ लोळे,तसेच शिवसेना जेजुरी शहर अध्यक्ष विठ्ठल सोनवणे, आंदोलक सुधीर गोडसे, जालिंदर खोमणे, सचिन पेशवे, अजिंक्य देशमुख मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button