तळेगाव स्टेशन भागातील तलावाला आले चौपाटीचे स्वरुप | पुढारी

तळेगाव स्टेशन भागातील तलावाला आले चौपाटीचे स्वरुप

तळेगाव स्टेशन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील पुणे-मुंबई या जुन्या महामार्गाजवळ निसर्गरम्य परिसरात वीज कार्यालयाजवळ असलेला तलाव तळेगावकरांचे आणि महामार्गाजवळून जाणा-यांचे आकर्षण ठरत आहे. तलावात पाणी असुन तलावाच्या भरावावर वड, पिंपळ, लिंब, आंबा चिकू, सुपारी, नारळ अशोक अशी सुमारे तीन हजार झाडे आहेत. यामुळे वेगवेगळ्या पक्षांचा वावर असल्यामुळे कर्णमधूर किलबीलाट तेथे असतो. झाडांमुळे आणि तलावातील पाण्यामुळे थंडगार वारा येतो, मध्यभागी पाण्याचे कारंजे असुन तेही लक्ष सर्वांचे वेधून घेत आहे. यामुळे नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला, मुले तेथे येतात.

थंडाव्याचा आनंद घेवून सध्या असलेल्या कडक तापमानापासून बचाव करतात. यामुळे तेथे चौपाटीचे स्वरुप आलेले असुन अल्हाददायक वातावरण आहे. तलावाच्या भरावाचा गोल साधारण दीड ते दोन किलोमीटर आहे. तलावावर बसण्यासाठी लायन्स क्लबने बाकड्याची सोय केलेली आहे. अनेक नागरिक सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी आणि शतपावलासाठी तेथे येतात, अनेक ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेवून पाण्यापर्यंत जाता येते. दुपारच्या वेळेस अनेकजण विश्रांतीसाठी झाडाच्या सावलीत बसतात.

प्रशासनाने या ठिकाणास पर्यटन स्थळाचा दर्जा दिला तर बोटींगची सोय होईल, तसेच घोडा, उंट आदी प्राण्यावर उदरनिर्वाह करणारे येतील. बालगोपालांची या प्राण्यावर बसुन तलावावर फेरफटका मारण्याची हौस पुरी होईल, तसेच खाद्य पदार्थ विकणा-यांचीही रोजीरोटीची सोय होईल, यामुळे तेथे आणखी गर्दी होईल तसेच महामार्गावरुन जाणारेही तेथे येतील. तळेगावच्या वैभवात भर पडेल. हे निसर्गरम्य ठिकाणी अनेकजण सतत येत असतात. अनेक तळेगावकरांना हे ठिकाण माहित नाही. काहीजण माहित असुनही येथे येण्यास उदाशीन असतात तरी या ठिकाणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी येथे फेरफटका मारावा.

Back to top button