काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद समसमानच ! पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मविआत रस्सीखेच | पुढारी

काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद समसमानच ! पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मविआत रस्सीखेच

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून झालेल्या निवडणुका, मतदारसंघाची फेररचना, यांचे विश्लेषण करताना पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद समसमान असल्याचे स्पष्ट होते. पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, दोन्ही पक्षांनी या जागेवर हक्क सांगितला आहे.

दोन्ही पक्षांच्या आघाडीच्या जागा वाटपात पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चारपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर पुणे शहरातून काँग्रेस निवडणूक लढविते. महाविकास आघाडी झाल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडून आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत.

या मतदारसंघातील गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांनी तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय नोंदविले. बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्या जागेसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मत व्यक्त केले. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप करताना ज्या मतदारसंघात जास्त ताकद आहे, त्या पक्षाला ती जागा मिळाली पाहिजे.

त्यानुसार पुण्याची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी आमची मागणी आहे. दुसर्‍या बाजूला काँग्रेस देखील त्यांच्या या परंपरागत मतदारसंघात लढाईच्या तयारीला लागली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात अनेक वर्षे ही जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी. महाविकास आघाडीचे नेते जागा वाटपाचा निर्णय घेतील, असे काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.

इतिहास काय सांगतो?

यापूर्वीच्या निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1999 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले होते. त्या वेळी भाजपचे प्रदीप रावत 41 टक्के मते मिळवीत विजयी झाले. दुसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसचे मोहन जोशी यांना 29 टक्के, तर राष्ट्रवादीचे उमेदवार व तत्कालीन खासदार विठ्ठल तुपे यांना 27 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांची राज्यात आघाडी झाली. 2004 मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी सुमारे पाऊण लाख मताधिक्याने जिंकले, तर 2009 मध्ये मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर कलमाडींचे मताधिक्य 25 हजारांपर्यंत घसरले. त्या वेळी मनसेने 75 हजार मते मिळविली होती.

काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद उपनगरांत जास्त आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर भाजपची ताकद वाढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये गेल्या दोन्ही निवडणुकांत भाजपने मोठे मताधिक्य घेत निवडणुका जिंकल्या. गेल्या चारही निवडणुका काँग्रेसने लढल्या. या मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे वडगाव शेरी हा एक मतदारसंघ असून, कसबा पेठ मतदारसंघ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत भाजपकडून खेचून घेतला.

पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. दोन्ही ठिकाणी पाच हजाराच्या फरकाने काँग्रेस पराभूत झाली. महापालिकेच्या सभागृहात राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसची ताकद खूप कमी झाली. मात्र, राष्ट्रवादीचे नगरसेवक हडपसर आणि खडकवासला मतदारसंघातून मोठ्या संख्येने निवडून आले. हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात नाहीत.

उपनगरात राष्ट्रवादीची ताकद जास्त

गेल्या निवडणुकांतील स्थिती लक्षात घेतल्यास राष्ट्रवादीची ताकद उपनगरांत अधिक आहे, त्या तुलनेत शहराच्या मध्यवर्ती भागातील विधानसभेच्या तीन मतदारसंघांत काँग्रेसची ताकद अधिक असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद पुणे लोकसभा मतदारसंघात जवळपास समसमान आहे.

महाविकास आघाडी कसबा पेठ मतदारसंघात ज्या पद्धतीने एकत्रितरीत्या लढली, त्या पद्धतीने त्यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ताकद लावल्यास ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाचा निर्णय घेऊन एकत्रितरीत्या लढावे लागणार आहे, असे मत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

काँग्रेसचे 10, तर राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक निवडून आले, तर काँग्रेसचे 10 नगरसेवक निवडून आले. मात्र, काँग्रेसचे दहाही नगरसेवक पुणे लोकसभा मतदारसंघातील आहेत, तर या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या तेरा होती. राष्ट्रवादीचे उर्वरित 29 नगरसेवक हडपसर व खडकवासला मतदारसंघांतील प्रभागांतून निवडून आले होते. आमदार आणि नगरसेवकांची संख्या लक्षात घेतल्यास दोन्ही पक्षांची ताकद जवळपास समसमान असल्याचे दिसून येते.

Back to top button