नारायणगावातील खून आर्थिक वादातून, आरोपींना अटक; नारायणगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई | पुढारी

नारायणगावातील खून आर्थिक वादातून, आरोपींना अटक; नारायणगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

नारायणगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: नारायणगावच्या हद्दीतील खोडद रोड परिसरात गुरुवारी (दि. २५) जेसीबीचालक साहेबराव नामदेव भुतांबरे (वय ४५, रा. कोतूळ, ता. अकोले, जि. अहमदनगर; सध्या रा. पाटे-खैरेमळा, नारायणगाव, ता. जुन्नर) यांचा खून झाला होता. यातील दोन आरोपींना नारायणगाव पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई करीत अटक केली.

प्रियाल ऊर्फ बंटी गंगाराम खरमाळे (वय ३१, रा. अमरवाडी, खोडद, ता. जुन्नर), देवराम विठ्ठल कोकाटे (वय २७, रा. कुंभारआळी, खोडद, ता. जुन्नर) अशी त्यांची नावे आहेत. आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून आरोपींनी खून केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

खुनाच्या घटनेनंतर आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी नारायणगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तसेच नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी पथके तयार करून सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला. खून झालेल्याचा फोटो सोशल मीडीयाद्वारे प्रसारित करीत त्याची ओळख पटवली.

घटनेच्या रात्री त्याला दोन इसमांसोबत खोडद रोडच्या दिशेने जाताना काहींनी पाहिले होते. त्यामुळे सदरच्या गुन्ह्यात त्याच्यासोबतच्या दोन इसमांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांना पोलिसांनी नारायणवाडी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आर्थिक व्यवहाराच्या वादातून खून केल्याचे कबूल केले. तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद धुर्वे करीत आहेत.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी पृथ्वीराज ताटे, पोलिस नाईक मंगेश लोखंडे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर, शैलेश वाघमारे, गोरक्ष हासे, संतोष साळुंके, योगेश गारगोटे, गोकूळ कोळी, गोविंद केंदे, अरविंद वैद्य आदींच्या पथकाने केली.

Back to top button