बावडा : वारकर्‍यांना करावा लागणार उन्हाचा सामना ! | पुढारी

बावडा : वारकर्‍यांना करावा लागणार उन्हाचा सामना !

राजेंद्र कवडे-देशमुख

बावडा (पुणे) : जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्व आपल्या अभंगांमध्ये विशद केले आहे…

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे।
पक्षीही सुस्वरे। आळविती॥
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत॥

अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी झाडांचे महत्त्व सांगितले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, झाडे ही आपल्यासाठी सगेसोयरे म्हणजे पाहुणे आहेत. आपल्या घरी पाहुणा येतो तेव्हा आपण त्यांची खूप काळजी घेतो. त्याप्रमाणे झाडेदेखील आपले पाहुणे समजून आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. सुमारे 400 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलेले झाडांचे महत्त्व किती दूरदृष्टीचे होते, याचा प्रत्यय सध्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची वृक्षांअभावी दिसत असलेली बोडकी अवस्था पाहताना येत आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग 965 जी) श्री क्षेत्र देहू ते पंढरपूरचे काम सध्या वेगात चालू आहे. या पालखी मार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली चिंच, वड आदी झाडे तोडण्यात आली आहेत. सध्या रुंदीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली असून, डांबरीकरणामुळे रस्ता सुंदर दिसत असला, तरी वृक्षांअभावी मात्र पालखी मार्गाचे निसर्गसौंदर्य हरपलेले दिसून येत आहे.

देहूहून प्रत्येक वर्षी पालखी सोहळ्याचे जुलै महिन्यात पंढरपूरसाठी प्रस्थान होते. मात्र, चालू वर्षी पालखी सोहळा हा लवकर म्हणजे जून महिन्यात प्रस्थान करणार असल्यामुळे वारकर्‍यांना तापमानाचा व उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. पालखी मार्गावर पूर्वी वृक्षांची दाट सावली होती. या दाट सावलीखाली वारकरी विश्रांती घेत, अभंगाचा व गप्पांचा फड रंगत असे. वारकरी डोक्यावर ही सावली घेऊन पंढरपूरकडे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या आशेने पावले उचलत. आता मात्र नव्याने होत असलेल्या पालखी मार्गावर वृक्षतोडीने सावली नाहीशी झाली आहे.

इंदापूर-अकलूज यादरम्यान पालखी मार्गावर दाट गर्द हिरवाई होती. मात्र, आता वृक्ष तोडण्यात आल्याने नव्याने तयार होत असलेला पालखी मार्ग ओसाड झालेला असल्याने वारकर्‍यांना चालताना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. देहू ते पंढरपूर यादरम्यान बहुतेक ठिकाणी अशीच ओसाड परिस्थिती दिसून येत आहे. नवीन पालखी मार्ग तयार होण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठिकठिकाणी थांबण्यासाठी नागरिकांची घरेदारे, विहिरी, दाट अमराई होती. मात्र, रुंदीकरणामुळे अनेक ठिकाणी ती नाहीशी झाली आहे.

त्यामुळे प्रवासादरम्यान मिळणारा आनंद, वेगळीच अनुभूती, यास वारकरी मुकणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. पालखी मार्ग ऐसपैस जरी झालेला असला, तरी मात्र दाट झाडीअभावी त्यातून पूर्वीप्रमाणे आनंद मिळणार का? असा प्रश्नही काही वारकर्‍यांनी उपस्थित केला आहे. चिंच, वड, लिंब यांचे वृक्ष निर्माण होण्यास अनेक दशके वेळ लागतो. डेरेदार वृक्ष ही काही एक-दोन वर्षांत निर्माण होत नाहीत. त्यामुळे वारकर्‍यांना आगामी अनेक वर्षे वृक्षांच्या सावलीविना पंढरपूरकडे ये-जा करावी लागणार, हे मात्र खरे आहे.

Back to top button