पुणे : बनावट ई-मेलच्या माध्यमातून 14 लाख रुपयांची फसवणूक | पुढारी

पुणे : बनावट ई-मेलच्या माध्यमातून 14 लाख रुपयांची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नामांकित शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिकार्‍यांना अनोळखी व्यक्तीने बनावट ई-मेल पाठवून तातडीने बँकेत पैशाचा भरणा करण्यास सांगून 13 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर मुंढवा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचे सहायक व्यवस्थापक सतीश पंढरीनाथ दौंडकर (वय 59, रा. खराडी) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 31 मे 2022 ते 23 ऑगस्ट 2022 यादरम्यान घडला. सतीश दौंडकर शिर्के कंपनीत सहायक व्यवस्थापक या पदावर काम करीत आहेत. त्यांचे कंपनीचे प्रतिनिधी वडगावकर यांना लियॉडिस बँक पीएलसी या बँकेचे खातेधारक व डीमोकेसे व एमसीआर या मेल आयडीच्या वापरकर्त्याने संपर्क केला.

त्यांनी लियॉडिस बँक पीएलसी या बँकेच्या खात्यावर पार्टीची रक्कम पाठविण्यास सांगून 13 लाख 80 हजार रुपये भरण्यास सांगितले. संबंधित रकमेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत विलंबाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर चौकशी करून सायबर पोलिसांनी याबाबत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे याबाबत पुढील तपास करीत आहेत.

Back to top button