पुणे : राष्ट्रवादीचे दहा पदाधिकारी ईडीचे लक्ष्य : शरद पवार | पुढारी

पुणे : राष्ट्रवादीचे दहा पदाधिकारी ईडीचे लक्ष्य : शरद पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ ते दहा पदाधिकार्‍यांना केंद्र सरकारने ईडीच्या माध्यमातून टार्गेट करण्याचे षड्यंत्र रचले आहे. त्यांना राष्ट्रवादीकडून काही अपेक्षा आहेत. मात्र, वाट्टेल ती किंमत मोजू; पण अपेक्षांची पूर्तता करणार नाही. जे खरे आहेत, त्यांना त्रास आणि चुकीच्या लोकांचे समर्थन, असा प्रकार सध्याचे सरकार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त आले होते. तो संपताच पत्रकारांनी त्यांना गाठले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईसह अनिल देशमुख, नवाब मलिक, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह, समीर वानखेडे प्रकरण, महाविकास आघाडीचे जागा वाटप, कर्नाटक निकाल अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी विस्ताराने भाष्य केले.

पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेच्या 9 ते 10 पदाधिकार्‍यांना त्रास देण्यात येत आहे. या सहकार्‍यांकडून सत्ताधार्‍यांना काही अपेक्षा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची आमची तयारी नाही. काय किंमत असेल ती मोजू; पण आमचा रस्ता सोडणार नाही. हे सूत्र ज्यांना मान्य नाही, त्यांना यातना सहन कराव्या लागतात. पण, आम्ही मागे हटणार नाही.

ते म्हणाले की, जयंत पाटील हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत. त्यांच्यावरील कारवाईबाबत मी माहिती घेऊन बोलेन. पण, अनिल देशमुख, नवाब मलिक यांना विनाकारण गोवले. अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप होते. तो आकडा वीस कोटींवर आला. ती त्यांच्या शिक्षण संस्थेला चेकने देणगी दिलेली आहे. ती रक्कम अजून त्याच खात्यावर आहे. त्यांना विनाकारण 13 महिने तुरुंगवास व सोबत खोटी बदनामी सहन करावी लागली.

महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? यावरून वाद सुरू झाले, या प्रश्नावर ते म्हणाले की, आमच्या तीन पक्षांत जागा वाटपासंदर्भात काहीच चर्चा झाली नाही. प्रत्येक पक्षाने दोन-दोन सहकारी द्यावेत, असे ठरले आहे. तिघांनी बसून मार्ग काढावा. काही अडचण आलीच, तर मी उध्दव ठाकरे, सोनिया गांधी किंवा खार्गे यांच्याशी बोलेन.

देवेंद्र माझ्या पुस्तकाचा आधार घेत आहेत
फडणवीस म्हणाले की, तुम्ही टीआरपीसाठी राजीनामा दिला, या प्रश्नावर ते म्हणाले की, फडणवीस यांच्याकडे उध्दव ठाकरेंबद्दल बोलण्यास काही नाही, त्यामुळे ते माझ्या पुस्तकाचा आधार घेते आहेत.

राहुल गांधी योग्य उमेदवार…
राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी कच्चे उमेदवार असले तरीही भाजपच त्यांना पुढे आणत आहे, असाही आरोप होत आहे, यावर पवार म्हणाले, भाजप राहुल गांधी यांना कच्चा उमेदवार मानत असले, तरीही जनता मानत नाही, हे लक्षात घ्या. कर्नाटकच्या निकालामुळे निवडणुका लांबू शकतात, असेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांच्यावरही टीका केली तसेच समीर वानखेडे प्रकरणावरही भाष्य केले.

मी पंतप्रधान होणार नाही : शरद पवार

तुमचे वय झाले, तरी तुम्ही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहात, या प्रश्नावर ते स्मित हास्य करीत शरद पवार म्हणाले, मला काहीही विचारा; पण वय झाले हा प्रश्न मागे घ्या, यावर एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले की, मी व नितीश कुमार समविचारी पक्षांची मोट बांधत आहोत. मी निवडणूकच लढणार नसल्याने पंतप्रधान
बनण्याचा प्रश्नच येत नाही.

कर्नाटकातील पराभवामुळेच ईडीचे दबावतंत्र : रोहित पवार

कर्नाटकमध्ये काँग्रेस विजयी झाल्यानंतर हे अपेक्षितच होते. भाजपविरोधात जनमत असल्याने त्यांच्याकडून याप्रकारे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर केला जात आहे, अशी टीका आमदार रोहीत पवार यांनी केली. आज सर्वसामान्य माणसांनाही सर्व काही समजू लागले आहे. कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर भाजपकडून असे काही केले जाणार होते. सध्या राजकीय वातावरण भाजपला अनुकूल नाही. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर अशी कारवाई करून दबावतंत्राचा वापर केला जात आहे, असे ते म्हणाले.

विरोधात बोलणार्‍यांना ईडीच्या नोटिसा येतात. शरद पवार यांनाही 2019 च्या निवडणुकीपूर्वी ईडीने नोटीस दिली. आता आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नोटीस आली. चौकशीला बोलाविण्यात आले. त्यामुळे ईडीच्या नोटिसा आमच्यासाठी नवीन नाहीत. देशातील दडपशाही सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना वारंवार ईडीच्या नोटिसा देऊन धमकाविण्याचे काम करीत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर 109 वेळा धाडी टाकून तपासणी करण्यात आली. याचा अर्थ 108 वेळा त्यांना तपासणीत काहीच मिळाले नाही. शेवटी देशमुख यांच्याविरोधात काहीच पुरावे मिळाले नाहीत.

                                                     – सुप्रिया सुळे , खासदार

Back to top button