पिंपरी-चिंचवड शहराचा पारा उतरला; मात्र उकाडा कायम | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहराचा पारा उतरला; मात्र उकाडा कायम

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचे कमाल तापमान रविवारी (दि. 21) 38.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. तापमानाचा पारा 39 अंशांच्या खाली घसरला असला तरी पुढील काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी कामाशिवाय उन्हात फिरू नये. तसेच, उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

लिंबू सरबत, ताक, लस्सीचा आधार

उन्हाचा तडाका अद्याप कमी झाला नसल्याने उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिक लिंबू सरबत, ताक आणि लस्सीचा आधार घेताना दिसत आहेत. त्याशिवाय, कैरी पन्हे, विविध प्रकारचे ज्यूस घेण्याकडे देखील नागरिकांचा कल वाढला आहे.

ज्येष्ठांची, बालकांची काळजी घ्या

ज्येष्ठ व्यक्ती आणि नवजात बालके यांना उष्णतेचा त्रास जास्त होऊ शकतो. त्यांचा उन्हापासून बचाव करावा. त्यांच्या शरीरात क्षार आणि पाण्याचा योग्य ताळमेळ साधला जात नाही. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती आणि नवजात बालकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

सौम्य उष्माघात जाणवू शकतो

सध्या शहरामध्ये असलेले तापमान लक्षात घेता शरीरातील पाणी कमी होणे, क्षारांचे प्रमाण कमी होणे, हे त्रास संभवतात. हातापायात ताकद नसल्यासारखे वाटणे, झोप येणे, थकवा जाणवणे, अशक्तपणा या बाबी सौम्य उष्माघातामध्ये मोडतात. या बाबी देखील आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकतात. त्यामुळे याबाबत पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.

काय काळजी घ्यायला हवी ?

  • उन्हामध्ये घराबाहेर पडताना गॉगल, टोपी, स्कार्फ आदींचा वापर करावा.
  • दुपारी 12 ते 2 या वेळेत शक्यता उन्हात जाणे टाळावे.
  • लहान मुले आणि ज्येष्ठांनी उन्हात फिरणे टाळावे.
  • एसीमध्ये बसले असताना तेथून उठून लगेच उन्हात जाऊ नये.
  • अचानक केलेल्या तापमान बदलामुळे शरीराला त्रास होऊ शकतो.

शरीराला हवे तीन ते साडेतीन लीटर पाणी

सध्याचा कडक उन्हाळा लक्षात घेता शरीरामध्ये दररोज तीन ते साडेतीन लीटर पाणी जायला हवे. साधारण 15 ते 16 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. शक्यतो फ्रीजचे पाणी पिऊ नये. माठातील पाणी प्यावे. आहारात दही, ताक, कलिंगड, काकडी आदींचा समावेश करावा. त्याशिवाय, ताक, लस्सी, लिंबू सरबत यासारख्या घरगुती पेय पदार्थांचा वापर करावा. जास्त उष्ण पदार्थ खाऊ नये.

सध्या जाणवणारा उन्हाचा तडाका लक्षात घेता दुपारी 12 ते 2 या वेळेत उन्हात फिरणे टाळावे. बाहेर पडताना गॉगल, टोपी, स्कार्फ यांचा वापर करावा. लहान मुले आणि ज्येष्ठांना विशेष जपावे. ताप आल्यास खूप अशक्तपणा जाणवत असल्यास, जुलाब झाल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. दररोज तीन ते साडेतीन लिटर इतके पाणी प्यावे. त्याच बरोबरीने ताक, लस्सी, सरबत आदी पेय घ्यावे. दही, कलिंगड, काकडी यांचा आहारात समावेश करावा.

                                           – डॉ. सायली तुळपुळे, एमडी, मेडीसीन.

Back to top button