जेजुरी : खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा धरणात बुडून मृत्यू | पुढारी

जेजुरी : खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा धरणात बुडून मृत्यू

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जेजुरी येथे श्री खंडोबादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या सिन्नर तालुक्यातील एका तरुणाचा जेजुरीजवळील नाझरे धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू झाला. एनडीआरएफच्या पथकाने या तरुणाचा मृतदेह जलाशयातून बाहेर काढला. सागर रावसाहेब जायभावे (वय 23, रा. गोंदे, ता. सिन्नर) असे या तरुणाचे नाव आहे.

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर जायभावे, त्याचा भाऊ आणि मित्र शुक्रवारी (दि. 19) जेजुरीला देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शनाला जाण्यापूर्वी घरातील देवांना कर्‍हा नदीच्या पाण्याने अंघोळ घालण्याची प्रथा असल्याने ते सर्वजण नाझरे धरणावर आले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सागर पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला. त्यानंतर तो खोल पाण्यात बुडाला.

सूचनांकडे दुर्लक्ष

स्थानिक तरुण, पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, त्यांना यश आले नाही. सायंकाळी पुण्याहून एनडीआरएफचे पथक बोलाविण्यात आले. त्यांनीही शोध घेतला. रात्र झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. शनिवारी (दि. 20) सकाळी या पथकाने सागरचा मृतदेह बाहेर काढला. पोलिस नाईक संदीप भापकर तपास करीत आहेत.

नाझरे धरण परिसरात देवकार्यासाठी मोठ्या संख्यने भाविक येतात. धरणात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने आतापर्यंत 70 हून अधिक भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. धरण्याच्या पाण्यात पोहू नये, असे फलक येथे लावूनही तसेच स्थानिक दुकानदारांनी सूचना करूनही अनेक भाविक विशेषतः तरुण पोहण्यासाठी धरणात उतरतात. त्यामुळे दुर्दैवी घटना घडतात, असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.

Back to top button