पुणे : मोटारीचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितल्याने दुचाकीस्वाराला उडविले. | पुढारी

पुणे : मोटारीचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितल्याने दुचाकीस्वाराला उडविले.

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दुचाकीस्वार तरुणाने आलिशान मोटा चालकाला उघडा असलेला दरवाजा बंद करण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे संबंधित मोटार चालकाने दुचाकीस्वाराचा पाठलाग करून त्याला पाठीमागून धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत डोळ्याला गंभीर जखम केली. ही घटना नुकतीच येरवड्यातील एअरपोर्ट रस्त्यावर घडली.

याप्रकरणी, येरवडा पोलिसांनी सचिन ओमप्रकाश शर्मा व दोन तरुणी (रा. चर्‍होली, आळंदी रोड) अशा तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर शुभम शरद बहिरट (वय 26, रा. शिवाजीनगर) असे जखमीचे नाव आहे. त्याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम बहिरट व त्याच्या तीन साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि त्याचा मित्र चिलवंत 11 मे रोजी एअरपोर्ट परिसरातून दुचाकीवर निघाले होते.

त्या वेळी परिसरात थांबलेल्या एका अलिशान मोटारीचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शुभमने मोटारचालक सचिनला दरवाजा बंद करण्यास सांगितला. त्याचा राग आल्यामुळे त्याने दुचाकीस्वार तरुणांना शिवीगाळ करीत चालता हो, असे म्हटले. शुभम दुचाकीवर जात असताना सचिनने मोटारीतून त्याचा पाठलाग केला. मोटारीची दुचाकीला धडक देऊन त्याला खाली पाडून बेदम मारहाण केली. सहायक पोलिस निरीक्षक आळेकर तपास करीत आहे.

तरुणीनेही दिली फिर्याद

27 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार येरवडा पोलिसांनी शुभम बहिरट आणि त्याच्या साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी या त्यांच्या मित्राच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्याने रामवाडी पोलिस चौकीच्या समोरील पंक्चरच्या दुकानासमोर आल्या होत्या. त्या वेळी शुभम आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button