कुरुलकरांच्या कृष्णलीला ; विदेशात जाताच भोवती हेर महिलांचा ट्रॅप | पुढारी

कुरुलकरांच्या कृष्णलीला ; विदेशात जाताच भोवती हेर महिलांचा ट्रॅप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डीआरडीओचा शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोरेश्वर कुरुलकर याला विदेशात अनेक राष्ट्रांच्या हेर महिलांनी घेरले असल्याचे तपासात समोर आले आहे. तो जेथे-जेथे गेला तेथील त्याची पदचिन्हे (फूटप्रिंटस) शोधण्याचे काम तपास अधिकारी वेगाने करीत आहेत. कुरुलकर गेल्या पंधरा दिवसांपासून एटीएसच्या कोठडीत असून, उद्या (दि. 15 मे) त्याची पोलिस कोठडी संपत आहे. त्यामुळे दुपारच्या सत्रात पुन्हा त्याला तपास यंत्रणा न्यायालयासमोर हजर करणार आहेत. दरम्यान गेले पंधरा दिवस पोलिस त्याची कसून चौकशी
करीत असून, दररोज नवीन माहिती समोर येत आहे.

अनेक महिला हेर होत्या पाळतीवर
कुरुलकर सन 2022 मध्ये किमान सहा देशांत गेल्याचे पुरावे सापडले असून, तो त्या पाकिस्तानी महिलेसोबत क्रिकेट मॅच पाहावयास गेला होता, तेथे त्याची आणखी काही महिलांची ओळख झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याने पाठवलेल्या मेलवरून ही माहिती समोर येत आहे.

विदेशातील फूटप्रिंटचा तपास
एकाच वेळी अनेक महिला हेर त्याच्या मागावर होत्या व त्यांनी त्याला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी घेरले होते. मात्र, कुरुलकरला या प्रकाराची माहिती समजली तेव्हा खूप उशीर झाला होता. त्याची सर्व महिलांची ओळख झाली होती. काही काळ तो सतत त्यांच्या संपर्कात होता. तेथील त्याचे फूटप्रिंट तपासण्याचे काम सुरू आहे.

न्यायालयात आज हजर करणार
कुरुलकरला आठ दिवसांपूर्वी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा आणखी बरेच पुरावे गोळा करायचे असल्याने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली तेव्हा न्यायालयाने ती मान्य केली.
उद्या, दि. 15 रोजी पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे, त्यामुळे तपास यंत्रणेचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरणार आहे.

Back to top button