रेल्वेला साखरेची गोडी ! पुणे विभागातून रेल्वेने सर्वाधिक साखरेची निर्यात | पुढारी

रेल्वेला साखरेची गोडी ! पुणे विभागातून रेल्वेने सर्वाधिक साखरेची निर्यात

प्रसाद जगताप

पुणे : पश्चिम महाराष्ट्राच्या शुगर बेल्टमधून थेट पश्चिम बंगाल, बिहारमध्ये साखर जाऊ लागल्याने पुण्यातील रेल्वे विभाग मालामाल झाला. 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात रेल्वेला साखरेच्या वाहतुकीपोटी 181 कोटी रुपये मिळाले. त्यामुळे रेल्वेला वर्षभरात इतर मालवाहतुकीच्या तुलनेत साखरेतून 46 टक्के अधिक उत्पन्न मिळाले.

साखरेपाठोपाठ पुणे विभागातून ऑटोमोबाईल सेक्टर, तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या वाहतुकीतून जादा उत्पन्न मिळाले आहे. यात पुणे विभागात रेल्वेच्या माध्यमातून साखरेची निर्यात सर्वाधिक होत असल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या पुणे विभागाला 2021-22 या आर्थिक वर्षात 276 कोटी रुपयांचा महसूल मालवाहतुकीतून मिळाला होता. यंदाच्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23 या कालावधीत रेल्वेला मालवाहतुकीतून 403 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर, पुढील 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता रेल्वेने 485 कोटी महसूल प्राप्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

या भागात साखरेची वाहतूक

रेल्वेच्या पुणे विभागातील बारामती, सांगली, कोल्हापूर, कराड स्थानकांवरून बंगाल, बिहार, मुंबईसह देशातील विविध भागांत साखर पाठवली जात आहे.

पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक

पुण्यातील लोणी भागात पेट्रोलियम पदार्थांची मोठी कंपनी आहे. त्या कंपनीच्या माध्यमातून देशभरात पेट्रोलियम पदार्थ पाठविले जातात. हे पदार्थ रेल्वेच्या लोणी स्थानकावरून लोड करून देशभरात पाठविले जातात. खासकरून याची वाहतूक देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात होत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

आर्थिक वर्षात मिळालेले उत्पन्न

साखर : 181 कोटी
ऑटोमोबाईल : 109 कोटी
पेट्रोलियम : 99 कोटी
अन्य वाहतूक : 14 कोटी
एकूण उत्पन्न : 403 कोटी

ऑटोमोबाईलची वाहतूक

रेल्वेच्या पुणे विभागातील पिंपरी-चिंचवड, खडकी, लोणी या स्थानकांवरून ऑटोमोबाईलसंदर्भातील विविध वस्तू, वाहनांची वाहतूक होत असते. येथून लोड होणारा हा माल देशाच्या उत्तर, दक्षिण भागात जातो.

गेल्या आर्थिक वर्षात 181 कोटींचा महसूल मिळाला आहे. हा महसूल इतर
माल वाहतुकीपेक्षा अधिक आहे.

       – अजय कुमार, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे पुणे विभाग

 

Back to top button