सासवड : संत सोपानदेव पालखीचे 15 जूनला प्रस्थान | पुढारी

सासवड : संत सोपानदेव पालखीचे 15 जूनला प्रस्थान

सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे सासवड (ता. पुरंदर) येथून 15 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री संत सोपानदेव समाधी मंदिरातून प्रस्थान होणार आहे,अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख अ‍ॅड.त्रिगुण गोसावी यांनी दिली. दि. 15 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री संत सोपानदेव समाधी मंदिराच्या देऊळवाड्यातून पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ होईल. दुपारचा विसावा पिंपळे, तर पांगारेतील निष्णाईदेवी मंदिरात रात्रीचा मुक्काम होईल.

16 जूनला यादववाडीत सकाळचा विसावा होऊन परिंचेत दुपारचा नैवेद्य, तर मांडकीत रात्रीचा मुक्काम होईल. 17 जूनला सकाळचा विसावा जेऊर, पिंपरे खुर्दमधून निरेत दुपारचा नैवेद्य, तर बारामती तालुक्यातील निंबुतमध्ये रात्रीचा मुक्काम होईल. 18 जूनला निंबुत छपरी, वाघळवाडीमार्गे सोमेश्वरनगरमध्ये पहिले गोल रिंगण होऊन मुक्काम होईल. 19 जूनला करंजेपूलमध्ये सकाळचा विसावा, तर दहा फाटामध्ये दुपारचा नैवेद्य, वडगाव निंबाळकरमध्ये दुपारचा विसावा होऊन, कोर्‍हाळे बुद्रुकमध्ये मुक्काम होईल.

20 जूनला कठीणपूलमध्ये सकाळचा विसावा, तर पणदरेत दुपारचा नैवेद्य, माळेगावमध्ये संध्याकाळी दुसरे गोल रिंगण होऊन मुक्काम होईल.21 जूनला कोकाटे महाराज वस्तीत दुपारचा विसावा होऊन बारामतीत मुक्काम होईल. 22 जूनला मोतीबागमध्ये सकाळचा विसावा, तर पिंपळीत पहिले बकरी रिंगण होईल. भवानीनगर, सणसर, बेलवाडी फाटामध्ये दुपारचा विसावा होऊन लासुर्णेत मुक्काम होईल.

23 जूनला लालपुरीत सकाळचा विसावा, कळंबमध्ये दुपारचा नैवेद्य, तर निमसाखरमध्ये दुपारचा विसावा होऊन रात्री निरवांगीत मुक्काम होईल. 24 जूनला रेडणीत सकाळचा विसावा, दुपारचा नैवेद्य लाखेवाडीत, तर निरनिमगाव चौकात दुपारचा विसावा होऊन अकलूजमध्ये मुक्काम होईल. 25 जूनला बाबीर पूल, महाळुंगमध्ये सकाळचा विसावा, श्रीपूरमध्ये दुपारचा नैवेद्य, तर माळखांबीत दुपारचा विसावा होऊन बोंडलेत मुक्काम होईल. 26 जूनला बोंडलेत संत सोपानदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज बंधू भेट सोहळा होईल. तर,भंडीशेगावमध्ये मुक्काम होईल. 27 जूनला दुपारी वाखरीत उभे रिंगण आणि पालख्यांच्या भेटीचा सोहळा तसेच पालखीचा मुक्काम होईल. 28 जूनला पालख्यांचे वाखरी पादुकाजवळ उभे रिंगण होऊन पंढरपूरमध्ये आगमन.

Back to top button