पुण्यात भाजपने दिली राजेश पांडेंना मोठी जबाबदारी, तर मोहोळ प्रदेश सरचिटणीसपदी कायम | पुढारी

पुण्यात भाजपने दिली राजेश पांडेंना मोठी जबाबदारी, तर मोहोळ प्रदेश सरचिटणीसपदी कायम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना प्रदेश सरचिटणीसपदी कायम ठेवण्यात आले असून, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांना प्रदेश उपाध्यक्षपदी घेण्यात आले आहे. पुणे शहरातून माजी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे ग्रामीणमधून शिवाजी भुजबळ, पिंपरी चिंचवडमधून सदाशिव खाडे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीतून माजी खासदार संजय काकडे आणि माजी नगरसेविका वर्षा तापकीर यांना वगळण्यात आले असून त्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा असताना पुण्यातून काकडे आणि तापकीर हे उपाध्यक्ष पदावर होते. त्यानंतर बावनकुळे यांच्या कार्यकारिणीत मोहोळ यांना घेण्यात आले. आता पांडे यांनाही संधी देण्यात आली आहे. मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक, तर पांडे हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे प्रदेश कार्यकरिणीवर नेमणुका करताना हा समन्वय साधला आहे.

पाटील, काकडे यांच्यासह 19 विशेष निमंत्रित

प्रदेश कार्यकारिणीवर पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात 19 जणांना विशेष निमंत्रित म्हणून घेण्यात आले आहे. त्यात पालकमंत्री चंद्रकात पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार संजय काकडे, विकास पासलकर, शंकर जगताप, अतुल देशमुख, रामशेठ गावडे पाटील, रोहिदास उंद्रे-पाटील, सुरेश धर्मावत, दीपक मिसाळ, मंगेश गोळे, मारुती वणवे, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, जयंत भावे, एकनाथ पवार, शेखर मुंदडा, राजेश पिल्ले, बाळासाहेब गावडे, संतोष कलाटे यांचा समावेश आहे.

नव्या शहराध्यक्षाची निवड आठवडाभरात

प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्याने आता नव्या शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया आठवडाभरात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहराध्यक्षपदासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेते धीरज घाटे, गणेश बिडकर, माजी मंत्री दिलीप कांबळे यांची नावे चर्चेत आहेत. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची गणिते डोळ्यांसमोर ठेवून शहराध्यक्षपदाचा चेहरा निवडला जाईल, हे निश्चित आहे.

 

Back to top button